मन्या सुर्वेला ओळखता? तो माझा भाऊ; नानांचा खुलासा

हिंसक प्रवृत्तीविषयी नानांचं वक्तव्य.... 

Updated: Jan 23, 2020, 10:26 AM IST
मन्या सुर्वेला ओळखता? तो माझा भाऊ; नानांचा खुलासा
नाना पाटेकर

मुंबई : गुंड, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींशी कधी संपर्क आला आहे का, असं विचारलं असता सहसा अनेकांचं उत्तर नकारार्थी असतं. पण, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी मात्र या प्रश्नाचं उत्तर देत अनेकांच्याच भुवया उंचावल्या. एका कार्यक्रमादरम्यान घेण्यात आलेल्या मुलाखतीत नानांनी त्यांच्या कुटुंबातील एका अशा नातेवाईकाचा खुलासा केला ज्याच्या नावाने एकेकाली गुन्हेगारी विश्वात भल्याभल्यांना घाम फुटत होता. 

चित्रपटांमधून विविध धाटणीच्या गुन्हेगारांच्याही भूमिका साकारणाऱ्या नाना पाटेकर यानी या कार्यक्रमादरम्यान या जगताशी असणारं त्यांचं एक नातं सर्वांपुढे ठेवलं. प्रत्यक्षात अशा कोणत्या मोठ्या गुन्हेगाराला भेटला आहात का, असा प्रश्न विचारला असता त्याचं उत्तर देत, मन्या सुर्वे माहितीये? असा प्रतिप्रश्न मुलाखतकारांना केला. या प्रश्नाचं उत्तर येण्याआधीच मन्या सुर्वे हा आपला मामेभाऊ असल्याचा खुलासा नानांनी केला. 

मन्या सुर्वे हा माझ्या मामाचा मुलगा. पण, त्याच्याप्रमाणे आपण होऊ नये यासाठी आईने मला मुरुडला नेलं. तरही तुमच्यात कुठेतरी या गोष्टी दडलेल्या असतातच. हे नाकारता येत नसल्याचंही नानांनी स्पष्ट केलं. हिंसेचा आक्रोश केव्हाच नसतो. किंबहुना आरडाओरडा करणारे गुंड नसताच. गुंड हा कायम शांत असतो. अशिक्षित माणूस गुंड झाला तर तो परवडतो, पण सुशिक्षित माणूस गुंड झाल्यानंतर मात्र गोंधळ असतो. कारण, तो सर्व परिस्थितीचा विचार करु शकतो. आपल्या याच वक्तव्याला आधार देत नानांनी गॉडफादरमधील मायकल या भूमिकेचं उदाहरण दिलं. 

वाचा : 'शरद पवारच राजकारणातील चाणक्य आणि चंद्रगुप्तही'

'अमुक एका व्यक्तिला मारेन हा... अशी ताकिद देत मारेकरी कधीच येत नाही. तो येतो, मारतो आणि जातो', असं सांगत नानांनी हिंसक प्रवृत्तीच्या व्यक्तीचं किंवा त्या एकंदर वृत्तीचं वास्तव सर्वांपुढे मांडलं. याला जोड होती ती म्हणजे त्यांनी कारकिर्दीत सुरुवातीच्या काळात साकारलेल्या काही गुन्हेगारी विश्वावर आधारलेल्या भूमिकांची.