रणबीरसोबतच्या ब्रेकअपविषयी कतरिनाचा मोठा खुलासा

त्या परिस्थितीमध्ये कतरिनाला मदत झाली ती म्हणजे... 

Updated: Apr 29, 2019, 07:17 PM IST
रणबीरसोबतच्या ब्रेकअपविषयी कतरिनाचा मोठा खुलासा

मुंबई : हिंदी कलाविश्वात काम करणाऱ्या कलाकार मंडळींच्या आयुष्याविषयी चाहत्यांमध्ये कमालीचं कुतूहल असतं. हे कुतूहल मग त्यांच्या आगामी चित्रपटांविषयी असो किंवा त्यांच्या खासगी आयुष्याविषयी असो. प्रेमप्रकरणांपासून ते ब्रेकअपपर्यंत सेलिब्रिटी वर्तुळात होणाऱ्या या चर्चा सर्वांचच लक्ष वेधतात. सध्याच्या घडीला अशाच चर्चांमध्ये नाव समोर आलं आहे ते म्हणजे अभिनेत्री कतरिना कैफ आणि रणबीर कपूर यांचं. एकेकाली बी- टाऊनमधील मोस्ट हॅपनिंग कपल अर्थाच बहुचर्चित जोडी म्हणून या दोघांची ओळख होती. पण, त्यांच्या नात्यात दुरावा आला आणि पुन्हा एकदा या वाटा वेगळ्या झाल्या. 

'मुंबई मिरर'ला दिलेल्या मुलाखतीत कतरिनाने रणबीर आणि तिच्या ब्रेअपनंतरच्या काळाविषयीची माहिती दिली. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये आल्यानंतर संपूर्ण कलाविश्वात त्यांच्याच प्रेमाचे वारे वाहत होते. पण, पाहता पाहता या नात्याला तडा गेला होता. ज्याविषयी सांगत कतरिना म्हणाली, 'एका नव्या टप्प्यावर पोहोचण्यासाठी जुन्या गोष्टी सोडाव्याच लागतात. या नात्यात ज्या गोष्टी घडल्या त्यामध्ये माझीही काही जबाबदारी होती, मी ज्या काही चांगल्या गोष्टी होत्या त्याचा स्वीकार करत आणि ज्या गोष्टींसाठी मी कारणीभूत नव्हते त्या दूर सारत पुढे गेले. या परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी माझ्या आईकडून एक दृष्टीकोन आणि मदत मिळाली'. 

कठिण परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी कतरिनाला तिच्या आईची मदत झाली होती. 'अनेक महिला, मुली या अशा प्रसंगांचा सामना करतात. यावेळी एकटेपणाची भावनाही तुझ्या मनात येत असेल, पण तू एकटी नाहीस' असं आईने तिला सांगितलं होतं. हा विचारच तिला संकटाच्या प्रसंगातून बाहेर काढण्यास मोठा मदतीचा ठरला. 

बराच काळ एकमेकांना डेट केल्यानंतर २०१६ मध्ये अखेर रणबीर आणि कतरिनाने त्यांच्या नात्याला पुढे न नेण्याचा निर्णय घेतला होता. रिलेशनशिपमधून विभक्त झाल्यानंतर या दोघांनीही आपआपल्या कामांवर लक्ष केंद्रित केलं. सध्याच्या घडीला रणबीर कपूर 'राझी' फेम अभिनेत्री आलिया भट्ट हिला डेट करत असून, त्यांचं नातं सर्वज्ञात आहे. कतरिनासोबतही त्याने मित्रत्वाचं नातं ठेवलं असून, नात्याक कोणत्याही संकोचलेपणा पाहायला मिळत नाही आहे.