कोरोनाची लस घ्यायची नाही; म्हणणाऱ्या अभिनेत्रीला कोरोनानं गाठलं, पाहा तिची अवस्था

या अभिनेत्रीला म्हणे आता कोरोनानं गाठलं आहे.   

Updated: Oct 18, 2021, 10:47 AM IST
कोरोनाची लस घ्यायची नाही; म्हणणाऱ्या अभिनेत्रीला कोरोनानं गाठलं, पाहा तिची अवस्था
व्हिडीओ स्क्रीनग्रॅब

मुंबई : मागच्या काही काळापासून लसीकरण मोहिमेनं देशात चांगलाच वेग घेतला आहे. अनेक नागरिकांनी लस घेत स्वत:ला कोरोनापासून दूर ठेवण्याच्या दिशेनं एक पाऊल उचललं आहे. पण, काहींनी मात्र लस न घेण्याचा निर्णयही घेतल्याचं पाहायला मिळत आहे. एक प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीही त्यापैकीच एक. या अभिनेत्रीला म्हणे आता कोरोनानं गाठलं आहे. 

ही अभिनेत्री आहे पूजा बेदी. पूजानं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. जिथं ती आपल्याला कोरोनाचा संसर्ग झाल्याचं सांगताना दिसत आहे. प्राथमिक अंदाजात आपल्याला कोणा एका वस्तूची, धुळीची अॅलर्जी झाली असावी असंच तिला वाटलं होतं. पण, काही केल्या प्रकृती सुधारत नसल्यामुळे अखेर तिनं कोरोना चाचणी केली. ज्यामध्ये तिला कोरोनाचा संसर्ग झाल्याचं निष्पन्न झालं. 

आपण लस न घेण्याचा निर्णय घेतला असून, सर्वस्वी शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीच्याच बळावर या साऱ्याला सामोरं जात असल्याचं तिनं सांगितलं. यामध्ये ती काढा, ऊसाचा रस, ताजी फळं या साऱ्याचं सेवन करण्याला प्राधान्य देत आहे. 

पूजानं जो व्हिडीओ पोस्ट केला, ज्यामध्ये ती बोलत असताना वारंवार खोकताना दिसत होती. तिची ही अवस्था पाहून लगेचच चाहत्यांनी चिंता व्यक्त करण्यास सुरुवात केली. पूजाच्या काही कलाकार मित्रांनीही तिच्याप्रती काळजी व्यक्त केल्याचं यावेळी पाहायला मिळालं.