भावाच्या तथाकथित प्रेमप्रकरणाविषयी प्रियांका चोप्राची प्रतिक्रिया

प्रियांकाचा भाऊ, एका दाक्षिणात्य अभिनेत्रीसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. 

Updated: Sep 26, 2019, 07:07 PM IST
भावाच्या तथाकथित प्रेमप्रकरणाविषयी प्रियांका चोप्राची प्रतिक्रिया

मुंबई : 'देसी गर्ल' प्रियांका चोप्रा काही दिवसांपासून भारतात आहे. आगामी चित्रपटाच्या प्रसिद्धीमध्ये आणि इतरही विविध कार्यक्रमांमध्ये ती व्यग्र आहे. मुख्य म्हणजे या साऱ्या वेळातही ती कुटुंबाला वेळ देण्यात कुठेही कमी पडत नाही. आई आणि भावाप्रती कायम सजग असणारी आणि त्यांची काळजी घेणारी प्रियांका यावेळी तिच्या भावाच्या बहुचर्चित प्रेमप्रकरणाविषयी व्यक्त झाली आहे. 

'मुंबई मिरर'शी संवाद साधताना तिने याविषयीचं आपलं मत दिलं. मुकेश अंबानी यांच्या घरी गणेशोत्सवाच्या सोहळ्यादरम्यान प्रियांकाचा भाऊ सिद्धार्थ याला दाक्षिणात्य अभिनेत्री नीलम उपाध्याय हिच्यासोबत पाहिलं गेलं होतं. ज्यानंतर त्या दोघांविषयी बऱ्याच चर्चा पाहायला मिळाल्या. 

भावाविषयी होणाऱ्य़ा याच चर्चांबाबत मत व्यक्त करत प्रियांका म्हणाली, 'मी इतरांच्या आयुष्यात काय सुरु आहे, याविषयी कधीच काही बोलत नाही. कारण त्या गोष्टींमध्ये मला रस नाही. माझ्या मते तुम्ही त्यालाच याविषयी विचारावं, जेव्हा तुम्ही पुढच्या वेळी त्याला भेटाल.'

प्रियांकाची ही प्रतिक्रिया पाहता सध्यातरी भावाच्या खासगी आयुष्याविषयी ती फार काही बोलण्यास उत्सुक नाही हे स्पष्ट होत आहे. मुख्य म्हणजे, ही देसी गर्ल स्वत:च्या खासगी आयुष्याविषयीही फारच गोपनीयता पाळण्याला महत्त्व देते. कलाविश्वात सेलिब्रिटींच्या आयुष्यात नेमकं काय सुरु आहे हे जाणून घेण्यासाठी प्रचंड उत्सुकता पाहायला मिळते. अशा परिस्थितीत अनेक सेलिब्रिटी त्यांच्या खासगी आयुष्याविषयी फारसं बोलणं टाळतात हेसुद्धा तितकंच खरं.