मुंबई : अभिनेत्री रेखा यांच्या खासगी आयुष्याविषयी कलाविश्वात कायमच कुतूहल पाहायला मिळालं आहे. त्यांच्या प्रेमप्रकरणांपासून अपयशी लग्नांपर्यंत सर्वच गोष्टींमुळे रेखा यांचं खासगी आयुष्य अनेकांचं लक्ष वेधून गेलं. दिल्लीस्थित व्यावसायिक मुकेश अग्रवाल यांच्याशी रेखा विवाहबंधनात अडकल्या होत्या. पण, हे लग्न काही फार काळ टीकू शकलं नाही. अवघ्या काही महिन्यांच्या वैवाहिक आयुष्यानंतरच या नात्यात असं काही वादळ आलं की गोष्टी बदलून गेल्या.
यासिर उस्मान यांनी रेखा यांच्या जीवनावर आधारित काही प्रसंगांवर 'रेखा द अनटोल्ड स्टोरी' या पुस्तकातून प्रकाशझोत टाकला. ज्यामध्ये त्यांच्या आणि मुकेश अग्रवाल यांच्या नात्याचीही चर्चा झाली. या पुस्तकात नमूद केल्यानुसार बीना रमानी यांच्या माध्यमातून रेखा आणि मुकेश यांची ओळख झाली होती. याच भेटीनंतर जवळपास पाच महिन्यांनीच मुकेश यांनी त्यांची मैत्रीण सुरिंदर कौर यांच्या घरी रेखा यांना प्रपोज केलं होतं. त्याच सायंकाळी या दोघांनी मुक्तेश्वर मंदिरात लग्नगाठ बांधली.
लग्नानंतर लगेचच दोघंही बाहेर गेले. पण, त्यानंतर एका आठवड्यानेच रेखा यांना एक बाब लक्षात आली, की मुकेश नैराश्यग्रस्त आहेत. गेल्या कित्येक दिवसांपासून ते औषधांचा आधार घेत असल्याचंही उघड झालं. आपल्या मानसोपचार तज्ज्ञाशी अफेअर असल्याचं मुकेश यांनी रेखा यांना सांगितलंही होतं.
रेखा यांच्या जीनवप्रसंगांवर प्रकाश टाकण्यात आलेल्या या पुस्तकात नमूद केल्यानुसार मुकेश आणि रेखा यांनी तिरुपती मंदिरात पुन्हा लग्नगाठ बांधली. यावेळी रेखा यांच्या आईवडिलांनी या विवाहसोहळ्याला हजेरी लावली होती. पुढे मुकेश यांना व्यवसायात तोटा झाला. ज्यानंतर त्यांच्या नात्यात दुरावा येऊ लागला.
लग्नाच्या जवळपास सहा महिन्यानंतरच रेखा यांनी मुकेश यांच्याकडे घटस्फोटाची कागदपत्र पाठवली होती. मुख्य म्हणजे त्यांनी यापूर्वी अनेकदा आत्महत्येचा प्रयत्न केल्याचंही या पुस्तकात नमूद करण्यात आलं आहे. अखेरीस मुकेश यांनी फार्महाऊसवरच रेखा यांच्या ओढणीने गळफास लावून घेत आत्महत्या केली.
मुकेश यांच्या आत्महत्येनंतर रेखा यांचा शेषनाग हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. तेव्हा रेखा यांच्यावर बरीच टीका झाली. अनेकांनी त्यांच्या पोस्टवर काळंही फासल्याचं म्हटलं जातं. या नात्यात आलेल्या अनपेक्षित वळणामागचं गूढ कोणालाही ठाऊक नाही. पण, त्याची चर्चा मात्र आजही होते हे खरं.