'तुमच्या IT Cell ची तुकडे-तुकडे गँग आहे; त्यांना आधी थांबवा'

पंतप्रधानांच्या ट्विटवर रेणुका शहाणेंचं सडेतोड उत्तर 

Updated: Dec 17, 2019, 04:35 PM IST
'तुमच्या IT Cell ची तुकडे-तुकडे गँग आहे; त्यांना आधी थांबवा' title=
नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात देशातील काही भागांमध्ये बरीच आंदोलनं सुरु आहेत.

मुंबई : कायमच आपल्या भूमिका अगदी ठामपणे मांडणाऱ्या अभिनेत्री रेणुका शहाणे Renuka Shahane यांनी पुन्हा एकदा देशातील सद्यस्थितीवर भाष्य करणारं ट्विट केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देशात भडकलेला हिंसाचार पाहता त्यानंतर केलेल्या शांततेच्या आवाहनासंदर्भातील ट्विटला उत्तर देत शहाणे यांनी थेट शब्दांत मोदींच्या IT सेललाच यासाठी जबाबदार ठरवलं आहे. 

CAA नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात देशातील काही भागांमध्ये बरीच आंदोलनं सुरु आहेत. त्याच धर्तीवर या कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्या जामिया मिल्लिया इस्लामिया jamia millia islamia या विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून लाठीमार करण्यात आला. ज्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली. ही सर्व परिस्थिती पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकामागोमाग एक ट्विट करत या कायद्यामुळे कोणत्याही धर्माला धक्का लागणार नसल्याचं नागरिकांना आश्वासन दिलं. शिवाय, ही वेळ शांतता, एकता आणि बंधुभाव जपण्याची असल्याचा संदेश त्यांनी ट्विट करत दिला. 

सर्वांनी अफवांपासून दूर राहण्याचं आवाहनही त्यांनी केलं. परिस्थितीवर पंतप्रधानांची ही भूमिका अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी हेरत त्यावर थेट शब्दांत आपली प्रतिक्रिया दिली. 'सर इतकंच असेल तर, कृपया तुम्ही नागरिकांना तुमच्या सर्व IT Cell ट्विटर हँडलपासून दूर राहायला सांगा. कारण तेच बंधुभाव, शांतता आणि एकता अशा मुद्द्यांवर जास्तीत जास्त अफवा, खोटेपणा पसरवतात', असं ट्विट शहाणे यांनी केलं.

वाचा : 'देशातील परिस्थितीमुळे सर्वांनी शरमेनं मान खाली करावी'

खरी तुकडे तुकडे गँग तर, तुमची IT Cell आहे, असं म्हणत त्यांना घृणेची भावना पसरवण्यापासून थांबवा, असा संतप्त सूर रेणुका शहाणे यांनी आळवला. यामध्ये निराशेची झलकही दिसली. शहाणे यांनी हे ट्विट करताच अनेकांनी त्यांच्या प्रतिक्रियेचं समर्थन केलं. 

जामिया मिल्लिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांप्रती पोलिसांनी केलेल्या कारवाईचा सध्या सर्व देशातील अनेक विद्यापीठांतून निषेध केला जात आहे. पश्चिम बंगाल, नवी दिल्ली, मुंबई, बंगळुरू अशा अनेक ठिकाणी या मुद्द्यावरुन निदर्शनंम केली जात आहेत. एकंदरच देशात नागरिकत्व सुधारणा कायद्यावरुन आगडोंब उसळला आहे. ज्यामध्ये अनेक जणांनी सत्ताधारी पक्षाला कारणीभूत ठरवण्यास सुरुवात केली आहे.