मुंबई : काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती, राज कुंद्रा याला पोर्नोग्राफी प्रकरणामध्ये न्यायालयानं जामीन मंजूर केला. तब्बल 62 दिवसांनंतर कुंद्रा कारागृहातून बाहेर आला. अद्यापही कुंद्रानं या संपूर्ण प्रकरणावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. परंतू शिल्पा मात्र सोशल मीडियावर दरम्यानच्या विश्रांतीनंतर आता बरीच सक्रिय झाली आहे.
मागील काही दिवसांपासून शिल्पा तिच्या सोशल मीडिया अकाऊंटच्या माध्यमातून अनेक पोस्ट करत आहे. यामध्ये कधी ती जीवनातील सकारात्मकतेविषयी बोलत आहे, तर कधी जीवनात घेतलेल्या निर्णयांविषयी बोलताना दिसत आहे. आता पुन्हा एकदा पतीला जामीन मिळाल्यानंतर शिल्पानं एक पोस्ट शेअर केली आहे.
शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty)नं नुकत्याच शेअर केलेल्या पोस्टमध्ये ती जीवनातील मोठ्या आणि महत्त्वाच्या निर्णयांबाबत बोलताना दिसत आहे. स्वत:वर अवलंबून राहताना... असं तिनं शेअर केलेल्या एका पोस्टमधील परिच्छेदाचं शीर्षक आहे.
पोस्टमध्ये पुढे लिहिलंय, 'कठीण प्रसंगाचा सामना केला. चरित्र्यवान व्यक्ती स्वत:वरच अवलंबून असतो. तो थेट पुढच्या पावलाशी संबंधित निर्णय घेतो. स्वत:च्या प्रत्येक निर्णयाची जबाबदारी घेतो आणि त्या निर्णयांना आपलंसं म्हणतो.'
शिल्पा नेमकी का गोंधळलीये?
शिल्पानं पुढे म्हटलं, मला अनेक सल्ले आणि समर्थन मिळालं. पण, शेवटी हे माझ्यावरच अवलंबून असतं की, मी जीवनात कोणता महत्त्वाचा निर्णय घेऊ? ही पोस्ट शेअर करताना तिनं This or That असे स्टीकर्सही लावले. म्हणजेच फॉलोअर्सकडेच तिनं या प्रश्नाचं उत्तर मागितलं. शिल्पाच्या या पोस्टचं सत्र पतीला जामीन मिळाल्यापासून सुरुच आहे. त्यामुळं आता तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर सतत नेटकऱी आणि चाहत्यांच्या नजरा आहेत.