कपिल शर्मा- शिवसेना वाद मिटला; जाणून घ्या चार वर्षांपूर्वी नेमकं काय झालं होतं?

नेमका वाद होता तरी काय? 

Updated: Aug 31, 2020, 01:54 PM IST
कपिल शर्मा- शिवसेना वाद मिटला; जाणून घ्या चार वर्षांपूर्वी नेमकं काय झालं होतं?  title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई : प्रेक्षकांना खळखळून हसवणारा आणि त्यांच्यासमोर कलेचा वेगळा नजराणा सादर करणाऱ्या विनोदवीर कपिल शर्मा आणि शिवसेना यांच्यात असणारा वाद अखेर संपुष्टात आल्याचं पाहायला मिळत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून याबाबतची प्रचिती आली. शिवसेनेचे नगरसेवक अमेय घोले यांची सोशल मीडिया पोस्ट यावर शिक्कामोर्तब करणारी ठरत आहे. 

घोले यांनी कपिलच्या कार्यक्रमातील एक पोस्ट शेअर करत त्याचे आणि कार्यक्रमाचे आभार मानले. ज्यावर कपिलनंही आनंद व्यक्त केला. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर या विषाणूशी लढणाऱ्या कोरोना योद्ध्यांच्या कार्याला सलाम करण्यासाठी म्हणून 'द कपिल शर्मा शो'च्या नव्या भागाचं आयोजन करण्यात आलं होतं. 

कोरोनाच्या संसर्गाच्या काळात आव्हानात्मक परिस्थिती हाताळणाऱ्या डॉक्टरांचा यावेळी सत्कारही करण्यात आला. राज्य सरकारपासून पालिका प्रशासनापर्यंत सर्वच स्तरांतून कशा प्रकारे या परिस्थितीमध्ये कार्य करण्यात आलं ज्यामुळं याचा फायदाच झाला, हे कार्यक्रमादरम्यान सांगण्यात आलं. अशा या स्तुत्य कार्यक्रमाचा एक व्हिडिओ घोले यांनी शेअर केला. ज्यामध्ये त्यांनी ट्विट करत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या प्रयत्न आणि मेहनतीमुळं साध्य झाल्याची भावना व्यक्त केली. शिवाय कपिलचे मनापासून आभारही मानले. प्रेक्षकांमध्ये आनंद पसरवण्यासाठी आणि माणुसकी जीवंत ठेवण्यासाठी त्यांनी हे आभार मानले. त्यांची ही पोस्ट पाहता काही वर्षांपूर्वीचा शिवसेना- कपिलचा वाद मिटला हे स्पष्ट होत आहे. 

 

नेमका वाद होता तरी काय? 

साधारण २०१६ मध्ये कॉमेडियन कपिल शर्मा यानं मुंबई महानगरपालिका कर्मचाऱ्यांनी आपल्याकडे लाच मागितल्याचं ट्विट केलं होतं. कपिलच्या या ट्विटमुळं बऱ्याच वादांनी डोकं वर काढलं होतं. इतकंच नव्हे तर, लाचखोर अधिकाऱ्याच्या नावाचा खुलासा करण्यासाठी पालिकेनंही मागणी केल्याचं पाहायला मिळालं होतं. कपिलच्या याच ट्विटमुळं पालिकेत सत्तेवर असणाऱ्या शिवसेनेवर विरोधकांनीही तोफ डागली होती.