close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

प्रिया वारियरविरोधात श्रीदेवींच्या कुटुंबातील सदस्याने उचललं हे पाऊल

'ब्लिंकिंग गर्ल' अडचणीत येण्याची शक्यता.... 

Updated: Aug 22, 2019, 12:13 PM IST
प्रिया वारियरविरोधात श्रीदेवींच्या कुटुंबातील सदस्याने उचललं हे पाऊल

मुंबई : 'ओरु अदार लव्ह' या चित्रपटातील 'माणिक्य मलराय पूवी' या एका गाण्यातील दृश्यामुळे रातोरात प्रसिद्धीझोतात आलेल्या दाक्षिणात्य अभिनेत्री प्रिया वारियर हिच्या बॉलिवूड पदार्पणाकडे सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत. प्रिया तिच्या बॉलिवूड पदार्पणावर पूर्ण लक्ष केंद्रीत करत असतानाच तिच्या वाटेत सुरुवातीलाच अडचणी आल्या आहेत. प्रियाच्या आगामी चित्रपटाविरोधात दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीने कायदेशीर पावलं उचलत चित्रपटाच्या निर्मात्यांना इशाराही दिला आहे. 

'ब्लिंकिंग गर्ल'च्या चित्रपटाचा विरोध करणारी ती व्यक्ती म्हणजे श्रीदेवी यांचे पती निर्माते- दिग्दर्शक बोनी कपूर. त्यांच्या निकटच्या सूत्रांचा हवाला देत 'डेक्कन क्रोनिकल'ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार 'श्रीदेवी बंगलो' या चित्रपटाच्या मुद्दावरुन बोनी कपूर यांनी संतापजनक प्रतिक्रिया दिली होती. 

संबंधित चित्रपटाशी जोडल्या गेलेल्या सर्वांवर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. किंबहुना या चित्रपटाचं नाव ऐकताच आणि त्याची पहिली झलक अर्थात फर्स्ट लूक पाहताच कपूर यांनी चित्रपटाच्या निर्मात्यांना कायदेशीर नोटीस पाठवली होती. पण, त्यांनी मात्र या नोटीसकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं. चित्रपटाच्या शीर्षकात श्रीदेवी यांच्या नावाचा वापर केला जाण्यावर त्यांनी हरकत दर्शवली शिवाय कायदेशीर कारवाईच्या दृष्टीनेही पावलं उचलली आहेत. 

प्रियाची मुख्य भूमिका असणाऱ्या या चित्रपटासंबंधी त्यांनी आपली स्पष्ट नाराजी व्यक्त केली. संबंधित व्यक्तींना वाटेल ते करण्याचं स्वातंत्र्य आहे. पण, ते कोणाच्याही नावाचा असा वापर करु शकत नाहीत असं म्हणत कपूर यांनी ही हरकत दर्शवल्याची माहिती सूत्रांनी दिली. तेव्हा आता येत्या काळात या चित्रपटाचं आणि पर्यायी प्रिया वारियर या दाक्षिणात्य अभिनेत्रीचं बॉलिवूडमधील भवितव्य काय असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.