साजिद म्हणतोय, हो! मी महिलांना वाईट वागणूक दिली

मी खोटं बोललोय, अनेकजणींना फसवलंय

Updated: Oct 18, 2018, 03:54 PM IST
साजिद म्हणतोय, हो! मी महिलांना वाईट वागणूक दिली

मुंबई: #MeToo या चळवळीची सुरुवात झाल्यापासून बऱ्याच बॉलिवूड सेलिब्रिटींची नावं समोर आली, ज्यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप लावण्यात आले होते. यामध्ये नाना पाटेकर यांच्यासोबतच विकास बहल, आलोकनाथ, रजत कपूर यांची नावंही पुढे आली होती.

लैंगिक शोषणाचे आरोप करण्यात आलेल्या सेलिब्रिटींमधील आणखीन एक नाव म्हणजे साजिद खान. 

तीन महिलांनी त्याच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला. या आरोपानंतर साजिदने त्याच्या आगामी चित्रपटाच्या दिग्दर्शनातूनही काढता पाय घेतला. 

आपल्यावर होणारे हे आरोप पाहता आता साजिदने त्याची चुक कबूल केल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. यासंबंधीचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. 

इथे लक्ष देण्याजोगी बाब म्हणजे हा एक जुना व्हिडिओ आहे, ज्यामध्ये साजिद तरुण असताना त्याने महिलांना कशाप्रकारे वाईट वागणूक दिली होती, ते सांगितलं आहे. 

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये साजिदने आपण महिलांचा अनादर केल्याचं स्वीकारल्याचं पाहायला मिळत आहे.

'मी खरंच खुप जास्त वाईट होतो. अनेक मुलींचं मन मी दुखावलं आहे. मी खोटं बोललोय, अनेकजणींना फसवलंय. जसं इतर सर्वजण करतात तसंच. पण, त्यावेळी माझ्या वाट्याला यश येत होतं', असं म्हणत साजिद आपल्या आयुष्यातील एका काळाविषयी सांगत होता. 

आपण आयुष्यात आलेल्या प्रत्येक चांगल्या मुलीला अतिशय वाईट वागणूक दिली, असंही त्याने यावेळी सांगितलं. 

हा व्हिडिओ कितीही जुना असला तरीही साजिदचं एकंदर वागणं पाहता त्याच्या मनात महिलांविषयी कधीच आदर नसल्याची संतप्त प्रतिक्रिया सोशल मीडियावर अनेक नेटकऱ्यांनी दिल्या आहेत. 

दरम्यान,  कलाविश्वात आलेलं #MeToo हे वादळ शमणार की त्याचा फटका बसत आणखी कोणत्या नव्या कलाकारांची नावं आणि त्यांची दुष्कृत्य सर्वांसमोर येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.