साजिद खानचं वागणं अश्लील, 'या' अभिनेत्रीच्या पतीचा खुलासा

कलाविश्वात काम कसं आणि कोणत्या अटींवर चालतं हे ठाऊक असलं तरीही...

Updated: Nov 27, 2018, 02:40 PM IST
साजिद खानचं वागणं अश्लील, 'या' अभिनेत्रीच्या पतीचा खुलासा

मुंबई : चित्रपट विश्वात गेल्या बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरु आहे ती #MeToo ची. कलाविश्वात होणारं लैंगिक शोषण आणि याचं वाढतं प्रमाण पाहता अनेक अभिनेत्रींनी याविरोधात आवाज उठवल्याचं पाहायल मिळालं होतं. या साऱ्या प्रकरणात दिग्दर्शक सादिज खान याच्यावरही गंभीर आरोप करण्यात आले होते. 

साजिदवर  करण्यात आलेले आरोप आणि त्यानंतर त्याच्या अडचणी पाहचा आता यात आणखी कागी गंभीर बाबी समोर आल्या आहेत. टेनिसपटू आणि चित्रपट अभिनेत्री लारा दत्ता हिचा पती महेश भूपती यानेही साजिदच्या वर्तणूकीविषयी काही खळबळजनक खुलासे केले आहेत. 

दिया मिर्झा, बिपाशा बासू या आणि इतरही काही अभिनेत्रींनी साजिदच्या वर्तणूकीविषयी महत्त्वाची वक्तव्यं केली होती. ज्याला दुजोरा देत त्याचं वागणं हे अश्लील होतं, असं लारानेही आपल्याला सांगितल्याचं तो म्हणाला. 

'जेव्हा आम्ही एकमेकांना डेट करत होतो, त्यावेळी लारा हाऊसफुल्ल या चित्रपटासाठी चित्रीकरण करत होती. आम्ही लंडनमध्ये होतो. ती आणि तिची हेअरस्टायलिस्ट म्हणजेच तिची खास मैत्रीण त्यावेळी साजिदच्या वागण्याविषयी बोलत होत्या. सहअभिनेत्रींशी तो कशा विचित्र प्रकारे वागतो याविषयी त्यांचं बोलणं सुरु होतं', असं महेश ‘We The Women’ या कार्यक्रमामध्ये म्हणाला. 

लाराने कशा प्रकारे आपल्यावा साजिदच्या वक्तव्याविषयी सांगितलं होतं, याचाही खुलासा त्याने केला. २०१० मध्ये प्रदर्शित झालेल्या 'हाऊसफुल्ल' या चित्रपटाच्या वेळी कशा प्रकारे चारही अभिनेत्रींना त्याच्या वागण्याचा त्रास होत होता, हेसुद्धा त्याने स्पष्ट केलं. पण, तुम्ही सहन करता म्हणून या परिस्थितीसाठी काही प्रमाणात तुम्हीही जबाबदार आहेत, असं तो म्हणाला. 

कलाविश्वात काम कसं आणि कोणत्या अटींवर चालतं हे महेशला ठाऊक असलं तरीही अत्यंत महत्त्वाच्या विषयाकडे दुर्लक्ष केलं जाण्याची बाब मात्र खटकत असल्याचंही त्याने स्पष्ट केलं. महेशने केलेला हा खुलासा पाहता आता पुन्हा एकदा साजिद खानच्या वर्तणूकीविषयी अनेक प्रश्न उपस्थित होण्यास सुरुवात झाली आहे.