Kalank : 'तबाह हो गये....' म्हणणाऱ्या माधुरीचा दिलखेचक अंदाज

हे गाणं पाहता 'देवदास'मधील 'चंद्रमुखीची'ही आठवते. 

Updated: Apr 9, 2019, 03:05 PM IST
Kalank : 'तबाह हो गये....' म्हणणाऱ्या माधुरीचा दिलखेचक अंदाज  title=
कलंक

मुंबई : माधुरी दीक्षित म्हटलं की तिच्या स्मितहास्यासोबतच आणखी एक गोष्टही चाहत्यांचं विशेष लक्ष वेधते. ते म्हणजे माधुरीचं नृत्यकौशल्य. कलाविश्वात पदार्पण केल्यापासूनच अभिनयासोबत माधुरीच्या नृत्यकौशल्यानेही प्रेक्षकांची विशेष मनं जिंकली. अशी ही धकधक गर्ल पुन्हा एकदा तिच्या याच कलेने प्रेक्षकांना घायाळ करत आहे. निमित्त ठरलं आहे, ते म्हणजे 'कलंक' य़ा चित्रपटातील नवं गाणं. 

श्रेया घोषाल हिने गायलेल्या 'कलंक' या चित्रपटातील 'तबाह हो गये' या गाण्याचा व्हिडिओ नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. अमिताभ भट्टाचार्य लिखित आणि प्रितमने संगीतबद्ध केलेल्या या गाण्याला माधुरी आणि सहकलाकारांच्या नृत्याने वेगळा साज चढवला आहे. केशरी रंगाच्या सुरेख अशा लांब बाह्यांच्या पायघोळ लेहंग्यामध्ये माधुरीचं सौंदर्य आणखी खुलून आलं आहे. या साऱ्याला जोड मिळाली आहे ती म्हणजे 'कलंक'च्या भव्य सेटची. सरोज खान आणि रेमो डिसूझा यांनी या गाण्यासाठी नृत्यदिग्दर्शन केलं आहे. 

'तबाह हो गये....' असे बोल असणारं हे गाणं पाहताना माधुरीच्या एका जुन्या भूमिकेची आठवण होते. 'देवदास' या चित्रपटात तिने साकारलेली 'चंद्रमुखी' पुन्हा पुन्हा आठवते. कलंकच्या निमित्ताने माधुरी पुन्हा एका अद्वितीय कथानकातून झळकणार आहे, असं म्हणणं वावगं ठरणार नाही. अभिषेक वर्मन दिग्दर्शित हा चित्रपट करण जोहरच्या हृदयाच्या अतिशय जवळचा आहे. आलिया भट्ट, वरुण धवन, सोनाक्षी सिन्हा, आदित्य रॉय कपूर यांच्या या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका असणार आहेत. तर माधुरी आणि संजय दत्त ही जोडी अनेक वर्षांनी प्रेक्षकांना एकत्र पाहण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे हा 'कलंक' सर्वतोपरी खास आणि तितकाच भव्य ठरत आहे. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x