मुंबई : देशाच्या ७०व्या प्रजासत्ताक दिनाच्या एक दिवस आधीच 'मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झाँसी' हा चित्रपट प्रदर्शित झाला. अभिनेत्री कंगना रानौतची महत्त्वाची भूमिका असणाऱ्या या चित्रपटाचा समिक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला तर, प्रेक्षकांनी मात्र काही ठिकाणी 'मणिकर्णिका'ला संमिश्र प्रतिसाद दिला.
पहिल्या दिवशी तुलने चित्रपटाच्या कमाईची सुरुवात संथ गतीने झाली. पण, नंतर बॉक्स ऑफिस कमाईच्या आकड्यांनी वेग पकडला. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विट करत कमाईच्या आकड्यांविषयीची माहिती दिली. ज्यामध्ये त्यांनी मणिकर्णिकाने आतापर्यंत ८.७५ कोटींचा गल्ला जमवल्याचं स्पष्ट केलं.
राधा कृष्ण जगरालमुडी आणि खुद्द कंगना रानौतने दिग्दर्शन केलेल्या या चित्रपटातून १८५७चा रणसंग्राम आणि देशासाठी पेटून उठणारी मशाल धगधगती मशाल झालेल्या झाशीच्या राणीच्या पराक्रमावर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे.
#Manikarnika picked up towards evening, after an ordinary/dull start in morning... #RepublicDay holiday [today] should witness a big turnaround... Sure, there’s appreciation, but it has to convert into footfalls... Fri ₹ 8.75 cr. India biz. #Hindi #Tamil #Telugu
— taran adarsh (@taran_adarsh) January 26, 2019
हिंदी, तामिळ आणि तेलुगू या तीन भाषांमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला समीक्षकांनी दिलेली दाद पाहता आता ऐन लागून आलेल्या सुट्टीच्या आठवड्याचा फायदा होतो का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मुख्य म्हणजे क्वीन कंगनाच्या या चित्रपटाला देशभरात बऱ्याच स्क्रीनमध्ये जास्तीत जास्त शो मिळाले आहेत. त्यामुळे चित्रपटाच्या कमाईत याचे परिणाम दिसणार का, याकडे विश्लेषकांचंही लक्ष लागलेलं आहे.
'मणिकर्णिका'ला टक्कर मिळत आहे ती म्हणजे अभिनेता नवाझुद्दीन सिद्द्दीकी याची मुख्य भूमिका असणाऱ्या 'ठाकरे' या बायोपिकची. अभिजीत पानसे दिग्दर्शित हा चित्रपट हिंदी आणि मराठी अशा दोन भाषांमध्ये प्रदर्शित झाला असून, प्रदर्शनापूर्वीपासूनच त्याच्याविषयी कलाविश्व आणि चाहत्यांच्या वर्तुळात कुतूहलाचं वातावरण पाहायला मिळालं होतं.