अरेच्चा! ही तर हुबेहूब मिथालीच

अभिनेत्रीला मिळाली नेटकऱ्यांची दाद 

Updated: Jan 29, 2020, 01:12 PM IST
अरेच्चा! ही तर हुबेहूब मिथालीच
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : क्रिकेट खेळावर प्रकाशझोत टाकणारे अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. यामध्येच आता आणखी एकाच चित्रपटाचं नाव जोडलं जाणार आहे. हा चित्रपट बऱ्याच अंशी खास आहे. कारण, भारतीय महिला क्रिकेट संघात अक्षरश: आपली कारकिर्द गाजवणाऱ्या मिथाली राज हिचा आतापर्यंतचा प्रवास या खेळातून उलगडला जाणार आहे. 

नुकतंच या चित्रपटाचं पहिलं पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. ज्यावर झळकणाऱ्या अभिनेत्रीचा चेहरा हा हुबेहूब मिथालीशीच मिळताजुळता दिसत आहे. ही अभिनेत्री म्हणजे तापसी पन्नू. 'शाबाश मिथू' असं या चित्रपटाचं नाव आहे, ज्यामध्ये तापसी मुख्य भूमिकेत पुन्हा एकदा प्रेक्षकांना थक्क करणार आहे. या भूमिकेसाठी तापसीला खुद्द मिथालीकडूनच काही बारकावे टीपण्यासाठी मदत होत आहे. ज्याआधारे ती प्रशिक्षण घेत असून, रुपेरी पडद्यावर क्रिकेटपटूची भूमिका साकारण्यासाठी स्वत:ला तयार करत आहे. 

'मला कायम विचारलं जायचं, तुझा आवडता पुरुष क्रिकेटपटू कोण? पण, तुम्ही त्यांना त्यांची आवडती महिला क्रिकेटपटू कोण असं विचारा', या एका वाक्याने प्रत्येक क्रिकेट प्रेमीला एका काहीसं थांबून विचार करण्यास भाग पाडलं की त्यांना हा खेळ आवडतो की त्यामध्ये खेळणाऱ्या व्यक्ती (तो किंवा ती), असं दमदार कॅप्शन देत तूच खरी गेम चेंजर असशील असे शब्द तिने अधोरेखित केले. 

वाचा : 'बेसन बर्फी' बनवत नव्वदीपार आजीबाईंनी सुरु केला स्टार्टअप

मिथाली राजनेही सोशल मीडियावर या पोस्टरची प्रशंसा करत आपला जीवनप्रवास रुपेरी पडद्यावर सादर करणाऱ्या तापसीचे आभार मानले. राहुल ढोलकिया दिग्दर्शित 'शाबाश मिथू' हा चित्रपट ५ फेब्रुवारी, २०२१ला प्रदर्शित होणार आहे.