मुंबई : 'ब्रह्मास्त्र'च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनचे आकडे समोर येताच ट्विटरवर चित्रपटाच्या कलेक्शनवरुन वाद सुरु झाला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या दोन दिवसांत जगभरात सुमारे 160 कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाच्या यशामुळे बॉलिवूडशी संबंधित सर्वच लोक खूप खूश आहेत.
'ब्रह्मास्त्र' दिग्दर्शक अयान मुखर्जी आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांनी सोशल मीडियाद्वारे चाहत्यांचे आभार मानले आहेत. पण समोर आलेल्या आकड्यांबाबत नेटीजन्स सहमत नसल्याचं दिसत आहे.
'ब्रह्मास्त्र'चे बॉक्स ऑफिस कलेक्शन बनावट असल्याचे युजर्स म्हणत आहेत. अनेक व्हिडिओ आणि पोस्टमध्ये थिएटर जवळजवळ रिकामे असल्याचं दिसत आहे. सोशल मीडियावर रिकाम्या चित्रपटगृहांचे फुटेज शेअर करून काही नेटिझन्स 'ब्रह्मास्त्र'चे बॉक्स ऑफिस कलेक्शन खोटे असल्याचा दावा करत आहेत. मात्र, असे अनेक यूजर्स आहेत जे या व्हिडिओला खोटा म्हणत आहेत.
सोशल मीडियावर वाद
रणबीर कपूर आणि आलिया भट्टचे चाहते आणि नेटिझन्स सोशल मीडियावर या मुद्द्यावर आपसात वाद घालत आहेत. चित्रपट रिलीज होण्याआधीचा हा व्हिडिओ असल्याचं चाहते सांगत आहे.
अनेक नेटिझन्स या चित्रपटाला सुपरहिट म्हणत आहेत, तर अनेकांना कलेक्शनच्या आकडेवारीवर विश्वास बसत नाही. नेटिझन्स त्यांचे दावे सिद्ध करण्यासाठी विविध तथ्ये समोर ठेवत आहेत. या चित्रपटाचा बॉक्स ऑफिस रिपोर्टही सकारात्मक असल्याचे सांगण्यात येत आहे.
बॉक्स ऑफिस इंडियाच्या अहवालानुसार, 'ब्रह्मास्त्र'च्या हिंदी आवृत्तीने दुसऱ्या दिवशी जवळपास 35.50 कोटींची कमाई केली आहे. दोन दिवसांचे एकूण कलेक्शन आता 66.50 कोटी रुपये झाले आहे.