Brazilian Singer Dani Li Death : सध्या अनेक मॉडल आणि प्रसिद्ध अभिनेत्री या सुंदर दिसण्यासाठी विविध शस्त्रक्रिया करत असतात. पण सुंदर दिसण्यासाठी केल्या जाणाऱ्या या शस्त्रक्रिया किती धोकादायक असतात, हे पुन्हा एकदा समोर आलं आहे. ब्राझीलमधील प्रसिद्ध गायिका दानी ली (Dani Li) चे निधन झाले आहे. वयाच्या 42 व्या वर्षी तिने अखेरचा श्वास घेतला. तिच्या मृत्यूनंतर तिचे चाहते आणि कुटुंबाला जबरदस्त धक्का बसला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दानी ली हिने काही दिवसांपूर्वीच लायपोसक्शन (कॉस्मेटिक संदर्भातील) शस्त्रक्रिया केली होती. पण त्यानंतर तिला त्रास व्हायला लागला आणि त्यातच तिचा मृत्यू झाला, असं बोललं जात आहे. पण अद्याप तिच्या मृत्यूचे खरं कारण समोर आलेले नाही. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत. लायपोसक्शनची शस्त्रक्रिया केल्यानंतर दानी ली ही ब्रेस्टची साईज कमी करण्यासाठीची शस्त्रक्रिया करणार होती. पण लायपोसक्शन शस्त्रक्रिया केल्यानंतरच तिला त्रास जाणवू लागला. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण डॉक्टरांनी तिचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
दानी लीच्या कुटुंबियांनी तिच्या इन्स्टाग्रामवर याबद्दल पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी तिच्या निधनाची बातमी देत तिच्यावर कधी अंत्यसंस्कार केले जातील, याबद्दल सांगितले आहे. या पोस्टवर अनेक चाहते हळहळ व्यक्त करताना पाहायला मिळत आहेत. दानी लीच्या मृत्यूमुळे तिच्या नवऱ्याला जबरदस्त धक्का बसला आहे. दानी ली हिला एक मुलगी असून ती अवघ्या 7 वर्षांची आहे. दानी लीच्या मृत्यूमुळे सेलिब्रिटी आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
लायपोसक्शनची शस्त्रक्रिया ही शरीरातील अतिरिक्त चरबी काढून टाकण्यासाठी केली जाते. याद्वारे पोट, कंबर, छाती, मान या भागावरील अतिरिक्त चरबी काढून लठ्ठपणा कमी केला जातो. ही शस्त्रक्रिया मुख्यत्वे लठ्ठपणा कमी करण्यासाठी केली जाते.
दरम्यान दानी ली ही ब्राजीलमधील प्रसिद्ध गायिका होती. ती I’m from the Amazon या गाण्यामुळे प्रसिद्धीझोतात आली. दानी लीने वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षीपासून गाणं गाण्यास सुरुवात केली. यापूर्वीही अनेक कलाकारांना शस्त्रक्रियांमुळे जीव गमवावा लागला आहे. काही महिन्यांपूर्वी अर्जेंटीनामधील प्रसिद्ध अभिनेत्री सिल्विना लूना हिचाही कॉस्मेटिक सर्जरीदरम्यान मृत्यू झाला होता.