स्वस्तातले कपडे खरेदी करणाऱ्या अभिनेत्रीला घ्यायचंय प्रायव्हेट जेट

जाणून घ्या तिच्या गुंतवणुकीविषयी 

Updated: Feb 6, 2020, 06:51 PM IST
स्वस्तातले कपडे खरेदी करणाऱ्या अभिनेत्रीला घ्यायचंय प्रायव्हेट जेट
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : आयुष्याच्या अमुक एका टप्प्यावर, या गोष्टी आपल्याला हव्या किंवा या गोष्टी नको असं प्रत्येकाचंच ठरलेलं असतं. लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेल्या कलाकार मंडळींचंही असंच आहे. म्हणजे जीवनात यशशिखरावर असतानाही येत्या काळात आपली ही स्वप्न आहेत.... जी साकार करायची आहेत, असं सध्या म्हणतेय ती अभिनेत्री आलिया भट्ट. 

फार कमी काळातच आपल्या कारकिर्दीत उत्तम उंची गाठणाऱ्या आलियाचीही काही स्वप्न आहेत. किंबहुना इतकी मोठी अभिनेत्री असूनही तिने काही गोष्टींची सवयच जणू स्वत:ला लावून घेतली आहे. म्हणजे स्वस्तातील कपडे खरेदी करणं असो किंवा गुंतवणूकीबाबत विचार करणं असो. कोणत्याही बाबतीच अवाजवी ताण न घेता मनमुराद आयुष्य जगण्यालाच तिने कायम प्राधान्य दिलं आहे. 

'हिंदुस्तान टाईम्स'शी संवाद साधताना आलियाने अशाच काही प्रश्नांची उत्तरं देत महत्त्वाच्या गोष्टी सर्वांपुढे आणल्या. कमीत कमी पैशांमध्येही मी आयुष्य जगू शकते. कारण मी मुळातच खर्च कमी करते असं तिने या मुलाखतीदरम्यान सांगितलं. 'ऐन तारुण्याच्या वयात असताना मी कधीच महागड्या वस्तू खरेदी केल्या नाहीत. माझ्याकडे पैसेही नसायचे. मी जेव्हा आई आणि पहिणीसोबत ठरलेल्या ठिकाणी म्हणजेच लंडनला सुट्टीसाठी जायचे तेव्हा मी Primark नावाच्या दुकानात जायचे. त्या ठिकाणहून मी ५, ६ पाऊंड इतक्या किमतीला टॉप खरेदी करायचे. आताही मी Primarkमधून पायजमे खरेदी करते. पायजमेच तर आहे..... त्यात वेगळं काय इतकं असं आलियाने अगदी सहजपणे स्पष्ट केलं. 

 
 
 
 

A post shared by Alia  (@aliaabhatt) on

गुंतवणुकीविषयी मला फार काही समजत नाही, पण....

सहसा गुंतवणुकीचे विषय निघाले की अनेकांची जशी भंबेरी उडते, त्याचप्रमाणे आलियाचंही होतं. पण, तरीही याविषयी जाणून घ्यायला ती कायम उत्सुक असते. आलियाने तिच्या पैशांतून केलेली आतापर्यंतची मोठी गुंतवणूक म्हणजे तिचं जुहू येथील घर. याशिवाय ती एफडी आणि बाँडमध्येही पैसे गुंतवते. कोणा एका गोष्टीवर आपण कसा खर्च केला आहे, याचं उदाहरण देत आलियाने स्वत:च्या पैशातून पहिली वस्तू खरेदी केल्याचं सांगत  Louis Vuitton bag घेतल्याची आठवण सर्वांसमोर ठेवली.  

एखादं मोठं स्वप्न प्रत्येकजण उराशी बाळगून असतं. आलियाचंही असंच एक स्वप्न आहे. ते म्हणजे तिला एक प्रायव्हेट जेट खरेदी करायचं आहे. शिवाय पर्वतरांगांमध्ये एखादं टुमदार घर असावं असंही तिचं स्वप्न आहे. हे स्वप्न लवकरच साकार होईल असा विश्वासही तिला आहे. अगदी सोप्या पद्धतीने आयुष्याकडे पाहत त्याच मार्गाने जीवन जगणाऱ्या आलियाचा हा फंडा खरंच अतिशय रंजक आहे, असं म्हणायला हरकत नाही.