का व्हायरल होतेय Cadbury Dairy Milk ची नवी जाहिरात?

  जाहिरात हे विविध क्षेत्रांतील आणि स्तराती व्यक्तींना जोडण्याचं एक सुरेख माध्यम आहे. काळ बदलत गेला तसं हे जाहिरात क्षेत्रही बदलत गेलं. नव्या संकल्पनांना स्वीकारत नवा नजराणा या क्षेत्रानं कायमच सादर केला. सध्याही याचीच प्रचिती येत आहे. जिथं भारतामध्ये एखाद्या पंथाप्रमाणं महत्त्व असणार्या क्रिकेट या खेळाचा संदर्भ घेत कॅडबरी या चॉकलेट ब्रँडची जाहिरात साकारण्यात आली आहे. 

Updated: Sep 21, 2021, 09:03 AM IST
का व्हायरल होतेय Cadbury Dairy Milk ची नवी जाहिरात?
छाया सौजन्य - सोशल मीडिया

मुंबई :  जाहिरात हे विविध क्षेत्रांतील आणि स्तराती व्यक्तींना जोडण्याचं एक सुरेख माध्यम आहे. काळ बदलत गेला तसं हे जाहिरात क्षेत्रही बदलत गेलं. नव्या संकल्पनांना स्वीकारत नवा नजराणा या क्षेत्रानं कायमच सादर केला. सध्याही याचीच प्रचिती येत आहे. जिथं भारतामध्ये एखाद्या पंथाप्रमाणं महत्त्व असणार्या क्रिकेट या खेळाचा संदर्भ घेत कॅडबरी या चॉकलेट ब्रँडची जाहिरात साकारण्यात आली आहे. 

Cadbury Dairy Milk कडून 1994 मध्य़े एक आय़कॉनीक जाहिरात साकारण्यात आली होती. जिथं फ्लॉरल प्रिंटेजड गाऊन घातलेली एक महिला क्रिकेटच्या मैदानावर आपल्या प्रियकराचा खेळ पाहण्यासाठी आलेली असते. ज्यावेळी तो सामना जिंकण्यासाठीची विजयी धाव ठोकतो तेव्हाच ही तरुणी स्टँडमधून उठून, सुरक्षा रक्षकांना झुगारून थेट मैदानात धाव मारते आणि प्रियकराला मिठीत घेते असं या जाहिरातीत दाखवण्यात आलं होतं. याचवेळी 'क्या स्वाद है जिंदगी में' हे गाणं बॅग्राऊंडला वाजतं आणि जाहिरात मोठ्या सहजतेनं प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेते. 

जवळपास 28 वर्षांनंतर सर्वच क्षेत्रात होणारे अमुलाग्र बदल आणि महिलांचा मोलाचा वाटा या सर्व गोष्टी नजरेत घेत या जाहिरातीला एक ट्विस्ट देण्यात आला आहे. महिलाही क्रिकेटचं मैदान गाजवतात, हा संदेश देण्यासाठी कॅडबरीनं जुन्या जाहिरातीचाच आधार घेत त्याची मुख्य पात्रच बदलली आहेत. 

प्रेयसीनं दणक्यात षटकार ठोकल्यानंतर स्टँडमध्ये असणारा तिचा प्रियकर उत्साहात मैदानात येतो आणि तिच्या या धडाकेबाज कामगिरीला उत्फूर्त दाद देतो. फक्त तोच नव्हे, तर मैदानात सामना पाहण्यासाठी आलेले क्रीडारसिकही तिच्या खेळाला दाद देतात हे या जाहिरातीत दाखवण्यात आलं आहे. 

मागील बऱ्याच वर्षांपासून क्रिकेटभोवती फिरणाऱ्या अनेक जाहिराती साकारण्यात आल्या आहेत. पण, यामध्ये पुरुषांनाच केंद्रस्थानी ठेवल्याचं पाहायला मिळालं होतं. Cadbury Dairy Milk च्या या नव्या जाहिरातीच्या निमित्तानं मात्र ही चौकट ओलांडत एका नव्या पर्वाची सुरुवातच केली आहे असं म्हणायला हरकत नाही. सोशल मीडियावर या जाहिरातीला मोठा प्रतिसाद मिळत असून, महिलांना मिळालेलं स्थान आणि त्यांच्या कामगिरीची सर्व स्तरांतून प्रशंसाही केली जात आहे.