Health Update : खरंच गेलाय बप्पी लहरींचा आवाज?

चाहत्यांनी व्यक्त केली चिंता 

Updated: Sep 21, 2021, 08:41 AM IST
Health Update : खरंच गेलाय बप्पी लहरींचा आवाज?
छाया सौजन्य - सोशल मीडिया

मुंबई : हिंदी चित्रपट जगतामध्ये डिस्को किंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बप्पी लहरी अर्थात सर्वांच्या बप्पी दा यांच्या आरोग्याबाबत अनेक चर्चा मागील काही दिवसांपासून पाहायला मिळत आहेत. काही चर्चांनुसार तर, त्यांचा आवाजच गेल्याचं म्हटलं गेलं. ज्यामुळं चाहत्यांनी चिंता व्यक्त करण्यास सुरुवात केली. 

आपल्या आरोग्याबाबतच्या या चर्चा पाहताच अखेर खुद्द बप्पी लहरी यांनीच ट्विट करत महत्त्वाची माहिती दिली. 'माझ्या आरोग्याबाबत काही माध्यमांमध्ये होणाऱ्या चर्चा आणि वृत्त ऐकून मला वाईट वाटतंय. चाहते आणि हितचिंतकांच्या आशीर्वादानं मी पूर्णपणे बरा आहे', असं बप्पी दांनी एका पोस्टमध्ये लिहिलं. 

बप्पी लहरी यांची ही पोस्ट वाचून त्यावर फॉलोअर्सप्रमाणेच कलाकारही व्यक्त झाले. गायक शान यानं कमेंट करत आरोग्याबाबतच्या या अफवा निराशाजनक असल्याचं म्हणत यातून लोकांना काय फायदा मिळतो असा संतप्त प्रश्न उपस्थित केला. 

दरम्यान, आपली प्रकृती उत्तम असल्याचं सांगणाऱ्या बप्पी लहिर यांची खुशाली जाणून घेतल्यानंतर चाहत्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. तुम्ही काळजी घ्या, देव तुम्हाला दीर्घायुष्य देवो अशा प्रार्थनापर सदिच्छा चाहत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून बप्पी लहरी यांच्यापर्यंत पोहोचवल्या.