उत्सुकता...'कान'च्या रेडकार्पेटची, महोत्सवात मराठीचा झेंडा

हॉलिवूडच्या कलाकारांची मांदियाळी असणाऱ्या कानच्या रेडकार्पेटवर बॉलिवूडचे काही ग्लॅमरस चेहरेही झळकणार आहेत.

Updated: May 14, 2019, 11:00 PM IST
उत्सुकता...'कान'च्या रेडकार्पेटची, महोत्सवात मराठीचा झेंडा title=

मुंबई : 'कान' फेस्टिव्हल २०१९ ची जय्यत तयारी सुरू झालीये. कानचं यंदा ७२ वं वर्ष आहे. हॉलिवूडच्या कलाकारांची मांदियाळी असणाऱ्या कानच्या रेडकार्पेटवर बॉलिवूडचे काही ग्लॅमरस चेहरेही झळकणार आहेत.तर तीन मराठी चित्रपट कान बझारमध्ये प्रदर्शित होणारेत. कान फेस्टिव्हल म्हटलं तर ११ दिवसांचा एकदम माहौल. जिथे जगभरातील हॉलिवूड कलाकारांचा झगमगाट डोळे दिपवून टाकतो. अलीकडच्या काळात बॉलिवूडच्या काही अभिनेत्रीही कानच्या रेडकार्पेटवर दरवर्षी आवर्जून हजेरी लावतात. कान फेस्टिव्हलमध्ये हॉलिवूड तारेतारकांसोबतच काही बॉलिवूड चेहरेही लक्षवेधी ठरताना दिसत आहेत. 

यंदा १९ मेला ऐश्वर्या कानमध्ये हजेरी लावणार आहे. त्यामुळे यंदा कानच्या रेडकार्पेटवर ऐश्वर्या कोणत्या लूकमध्ये एन्ट्री करतेय याची नक्कीच उत्सुकता असणारे. कानमध्ये यंदा बॉलिवूडच्या आणखी एका अप्सरेकडे लक्ष असणारे. बॉलिवूडची मस्तानी दीपिका  पदुकोण १६ मेला कानच्या रेडकार्पेटवर आपली अदा दाखवणारे.

त्याचप्रमाणे बॉलिवूडची क्वीन कंगना दोन दिवस कानमध्ये हजेरी लावणारे. ही फॅशनक्वीन यंदा आपला काय जलवा दाखवते याचीही उत्सुकता चाहत्यांना लागलीये. कंगना १६ आणि १८ मेला कानच्या रेडकार्पेटवर हजेरी लावणार. 

यंदाच्या कान फेस्टिव्हलचं वैशिष्ट्य म्हणजे कान बझारमध्ये तीन मराठी चित्रपट दाखविण्यात येणारेत. यामध्ये डॉ. मोहन आगाशे आणि सुमित्रा भावे निर्मित दिठी, मिलिंद लेलेंची निर्मिती आणि मुक्ता बर्वेची प्रमुख भूमिका असलेला 'बंदीशाळा' आणि अथर्व पाध्ये या बालकलाकाराच्या अभिनयाने सजलेला कोकण ते पॅरिस भावूक प्रवास घडवणारा 'आरॉन' चित्रपट कान बझारमध्ये विशेष चित्रपट म्हणून प्रदर्शित होणार आहे.