SSR Case : सीबीआय क्राईम सीन रिक्रिएट करण्यासाठी सुशांतचा पुतळा फासावर चढवणार

अभिनेता सुशांत सिंह राजपूतने १४ जून रोजी त्याच्या वांद्रे येथील राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली.    

Updated: Aug 21, 2020, 01:37 PM IST
SSR Case : सीबीआय क्राईम सीन रिक्रिएट करण्यासाठी सुशांतचा पुतळा फासावर चढवणार  title=

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतने १४ जून रोजी त्याच्या वांद्रे येथील राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. सुशांतच्या आत्महत्येला दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ लोटला आहे तरी देखील त्याच्या आत्महत्ये मागचं ठोस कारण समोर आलेलं नाही. मुंबई आणि बिहार पोलिसांनंतर सुशांत आत्महत्या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपावण्यात आली आहे. तर सुशांत आत्महत्या प्रकरणी सीबीआय आजपासून तपास करणार आहे. 

सीबीआयची टीम आज सुशांतच्या घरी क्राईम सीन रिक्रिएट करण्यासाठी सज्ज झाली आहे. क्राईम सिन रिक्रिएट करण्यासाठी सुशांतच्या वजनाचा एक पुतळा तयार करण्यात येणार आहे. यासाठी फॉरेंसिक टीम देखील सीबीआयसोबत असणार आहे.  शिवाय सीबीआयच्या टीमनं सुशांतचा लॅपटॅप आणि मोबाईल देखील ताब्यात घेतला आहे. 

या प्रकरणाच्या तपासासाठी मुंबईत आलेल्या सीबीआय अधिकाऱ्यांच्या टीम तयार करण्यात आल्या आहेत. यापैकी एक टीम मृत्यूप्रकरणाशी संबंधित कागदपत्रे ताब्यात घेण्यासाठी वांद्रे पोलीस स्थानकात पोहचली आहे. तर दुसरीकडे नवी मुंबईतील गेस्ट हाऊसवर चौकशी सत्राला प्रारंभ झाला आहे. 

शिवाय याप्रकरणी सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी रिया चक्रवर्तीचा भाऊ शौविकला आणि सुशांतचा कुक असणाऱ्या नीरज यालाही पाली हिल येथून चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. गरज भासल्यास सुशांत आत्महत्या प्रकरणातील अन्य व्यक्तींची देखील चौकशी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.