मुंबई: नुकतंच बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर या जोडीच्या नात्यात बाळाची चाहूल लागल्याची बातमी समोर आली. आलियानंच सोशल मीडियाचा आधार घेत आपण गरोदर असल्याचं सांगितलं. एकिकडे आनंदाला उधाण आलेलं असतानाच या कलाजगतातून दुसरीकडे मात्र काहीशी निराशाजनक बातमी समोर आली आहे. (celebrity singer couple hemachandra sravana bhargavi headed towards separation)
9 वर्षांच्या सहजीवनानंतर एका लोकप्रिय सेलिब्रिटी जोडीनं अखेर विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. ते या निर्णयापर्यंच का पोहोचले याचा खुलासा मात्र अद्यापही होऊ शकलेला नाही.
ही जोडी आहे गायक हेमचंद्र (Hemachandra) आणि गायिका श्रवणा भार्गवी (Sravana Bhargavi) यांची. 2009 मध्ये या दोघांची पहिल्यांदाच भेट झाली होती. चित्रीकरणादरम्यान त्यांची पहिली भेट झाली होती. सुरुवातीची मैत्री आणि त्यानंतरचं प्रेम असं नातं पुढे गेलं आणि या जोडीनं 2013 मध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला.
2016 मध्ये त्यांच्या नात्यात एका चिमुकलीनं प्रवेश केला. लॉकडाऊनच्या काळातही हेमचंद्रनं त्याच्या पत्नी आणि मुलीसमवेत सर्वाधिक वेळ व्यतीत केला होता. सर्वकाही सुरळीत असतानाच या जोडीच्या नात्यात दुरावा आला आणि होत्याचं नव्हतं झालं.
हेमचंद्र आणि श्रवणा भार्गवी ही जोडी तेलुगू चित्रपटसृष्टीतील प्रचंड गाजलेली जोडी आहे. त्यांनी बरीच लोकप्रिय गाणी गायली आहेत. श्रोत्यांच्या मनावर आपल्याल आवाजानं राज्य करणाऱ्या या जोडीच्या नात्याला मिळालेलं हे वळण पाहता चाहत्यांनाही यावर विश्वास ठेवणं कठीण होत आहे.