मुंबई : कोरोनाची झळ प्रत्येकाला बसली. अनेक कलाकरांनी आपल्या जवळच्या माणसांना या काळात गमावलं. पण तरी देखील चेहऱ्यावर हास्य ठेवत प्रेक्षकांचं मनोरंजन करणाराच खरा कलाकार. अशीच एक अभिनेत्री म्हणजे श्रेया बुगडे. 'चला हवा येऊ द्या' च्या मंचावरून श्रेया आपल्याला भरभरून आनंद देत असते. पण असं करताना तिच्यावर कोसळलेला दुःखाचा डोंगर मात्र ती बाजूला ठेवते.
लॉकडाऊनमुळे सध्या "चला हवा येऊ द्या'चं शुटिंग सुरू आहे. या कार्यक्रमात अभिनेता स्वप्नील जोशीने कॉमेडी क्वीन श्रेया बुगडेसोबत गप्पा मारल्या. श्रेया सध्या कोणत्या कठीण प्रसंगातून जातेय हे त्याने प्रेक्षकांना सांगितलं.
श्रेयाच्या अतिशय जवळची दोन माणसं तीने या कोरोनामुळे गमावली आहे. त्यांचं असं अचानक जाणं श्रेयासाठी खूप धक्कादायक आहे. श्रेयाच्या दोन लाडक्या मावशींचे कोरोनामुळे निधन झाले आहे. धक्कादायक बाब म्हणजे अगदी 24 तासांत दोन्ही मावशींनी जगाच निरोप घेतला आहे.
स्वप्नीले श्रेयाला या प्रसंगावर बोलतं केलं. श्रेया म्हणाली की,'माझ्या या दोन्ही मावशींना कोरोनाची लागण झाली होती. कोरोनाची पहिली लाट आली तेव्हा आम्ही फक्त खबरदारी घेतली. पण दुसरी लाट आमच्या घरावर येऊन धडकली. या लाटेने माझ्या दोन्ही मावशींना अवघ्या 24 तासांत आमच्यापासून हिरावून नेलं. मी त्या दोघींचीही खूप लाडकी होते. त्या अचानक सोडून जातील असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. आमच्यासाठी हा खूप मोठा धक्का होता.' हे सांगताना श्रेयाला अश्रू अनावर झाले.