'ड्युटीवर गेलेले माझे बाबा घरी कधी येणार'

CHYD : पोस्टमन काकांचं पोलिसांना पत्र... 

Updated: Nov 21, 2019, 09:59 AM IST
'ड्युटीवर गेलेले माझे बाबा घरी कधी येणार'

मुंबई : झी मराठीवरील (Zee Marathi) 'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya) या कार्यक्रमातून कायमच प्रेक्षकांच मनोरंजन होतंच असतं पण या कार्यक्रमातून सामाजिक प्रश्नांकडे देखील प्रेक्षकांच लक्ष वेधलं जातं. सगळीकडे शांतता आणि सुव्यवस्था राहावी यासाठी अहोरात्र सज्ज असलेले आपले महाराष्ट्र पोलीस (Maharashtra Police) हे समाजातील महत्वाचा घटक आहेत. 

पोलिसांमुळे आज आपण आपल्या शहरात, आपल्या घरात सुरक्षित आहोत. पण पोलिसांच्या कुटुंबियांची त्यांच्याप्रती काय भावना आहे हे चला हवा येऊ द्याच्या मंचावर पोस्टमन काका (Postman Kaka) असलेल्या अभिनेता सागर कारंडेने (Sagar Karande) मांडली आहे. आपल्याला माहितच आहे या कार्यक्रमात पोस्टमन काका पत्राद्वारे संवाद साधतात. यावेळीचं पत्र हे पोलिसांसाठी त्यांच्या मुलांनी लिहिलेलं. 

आपल्याला माहितच आहे, सगळीकडे मुख्यमंत्री कुणाचा? महाराष्ट्रात सत्ता कुणाची स्थापन होणार अशी चर्चा रंगलेली असताना मात्र पोलिसांच्या मुलांना 'ड्युडीवर गेलेले आपले बाबा घरी कधी येणार?' हाच प्रश्न सतावत असते. आज आपण गुन्हेगाराचा विचार करतो पण या गुन्हेगारांना पकडून देणाऱ्या पोलिसांचा कधी विचार केला जातो का? त्यांना महत्वाच्या सुविधा सहज उपलब्ध होतात का? याकडे देखील लक्ष द्यायला हवे. 

बंदुक हातात घेऊन नागरिकांच रक्षण करणाऱ्या पोलिसांवर तीच बंदूक घेऊन आत्महत्या करण्याची वेळ का येते? याकडे आपण लक्ष द्यायला हवं. सामान्यांनी पोलीस स्टेशनची पायरी चढू नये असं म्हणतात. पण पोलिसांनाच ती पायरी उतरून बाहेर यायला लागू नये असा समाज आपण घडवायला हवा, अशा भावना या पत्रात मांडल्या होत्या. आपल्याला माहितच आहे हे पत्र लेखक अरविंद जगताप यांच्या लिखाणातून लिहिलेलं आहे.