मुंबई : काही कलाकार हे त्यांच्यापुढं येणाऱ्या प्रत्येक संधीचं सोनं करतात. मी अमुक एक पात्रच साकारेन किंवा तमुक धाटणीच्याच भूमिका करेन अशा त्यांच्या अटी नसतात. आपल्यासमोर येणाऱ्या प्रस्तावाची ताकद ते पाहतात आणि त्या अनुषंगानं निर्णय घेत करिअरच्या वाटा निवडतात.
अशाच काही कलाकारांना अनेकदा काही अशा अडचणींचा सामना करावा लागतो, ज्यामुळं त्यांच्यापुढं मोठा पेचही उभा राहतो.
कलाकारांच्या याच यादीतील एक नाव म्हणजे अभिनेता सुनील ग्रोवर (Sunil Grover).
सुनील ग्रोवर हा त्याच्या विनोदी अंदाजासाठी आणि त्यानं साकारलेल्या पात्रांसाठी ओळखला जातो. 'कॉमेडी नाईट्स विथ कपिल', या कार्यक्रमामध्ये त्यानं 'गुत्थी' हे स्त्रीपात्र साकारलं आणि भल्याभल्यांच्या चेहऱ्यावर हसू आणलं.
सुनीलच्या खासगी आयुष्यात मात्र या पात्रामुळं बरीच उलथापालथ झाली होती.
एका मुलाखतीत सुनीलनं याचा खुलासा केला होता. तो वास्तव्यास असणाऱ्या एका इमारतीमध्ये इतर लहान मुलं त्याला सतत चिडवत होती.
तुझे बाबा तर मुलगी होतात, स्त्रीच्या रुपात दिसतात... असं म्हणत ते सुनीलच्या मुलाला हिणवत होते.
सुनीलपर्यंत ज्यावेळी हीबाब पोहोचली त्यावेळी आपण हे इतरांच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी करतो याची जाणीव त्यानं लेकाला करुन दिली.
तुम्ही मुलगी नका होऊ... असंच मुलगा त्याला सांगत होता. त्यादरम्यानच एक दिवस तो मुलाला घेऊन मॉलमध्ये गेला.
तिथे अनेकजण एकत्र आले आणि त्यांनी सुनीलसोबत सेल्फी घेण्यास सुरुवात केली. हे सर्व पाहून आपले बाबा काहीतरी चांगलं काम करतात हे त्याच्या मुलाला समजलं.
विनोदवीर होणं अतिशय कठीण...
विनोदवीर होणं मुळात अतिशय कठीण आहे, शिवाय हे पुण्याचंही काम आहे असं सुनीलचं म्हणणं.
आपण कुठेही गेलो असता, लोकं कितीही तणावात असले तरीही त्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमटतं हे पाहूनच मला खूप छान वाटतं असं सुनील कायम म्हणतो.