'स्वस्तातल्या साडीसाठी गुजरात ठीक आहे, नेतानिवडीसाठी नाही'

'चला हवा येऊ द्या'फेम लेखक अरविंद जगताप यांचा नेतेमंडळींना सणसणीत टोला 

Updated: Oct 31, 2019, 11:25 AM IST
'स्वस्तातल्या साडीसाठी गुजरात ठीक आहे, नेतानिवडीसाठी नाही' title=

मुंबई : 'छत्रपती शिवरायांच्या या महाराष्ट्रात.....', अशा घोषणा देत साधारण महिन्याभरापूर्वी अनेक राजकीय नेतेमंडळींची महाराष्ट्राचे दौरे केले. राज्याच्या कानाकोपऱ्यात जात जनतेची भेट घेतली. इतकंच काय, तर महाराजांच्या पकाक्रमाच्या गाथेचा पुनरुच्चार थेट दिल्लीतही झाला. हे सारं सत्र सुरु होतं ते म्हणजे विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने. 

निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी किंवा उतरल्यानंतर राजकाकीय वर्तुळात प्रत्येक नेत्याची आपली अशी एक आखणी असते. यामध्ये कोणत्या गोष्टींच्या बळावर मतदारांना प्रभावित करायचं यावर अधिकाधिक भर दिला जातो. यामध्येच मग काही गोष्टी पुढे येतात. महाराष्ट्रात याच गोष्टींमध्ये जनतेच्या अतिशय जिव्हाळ्याचा विषय म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. स्वराज्याची स्वप्न उराशी बाळगून याच स्वराज्याचा भक्कम पाया रचणाऱ्या महाराजांची शौर्यगाथा म्हणजे अनेकांनासाठी अमृतानुभव. 

अशाच या राजाचा उल्लेख करत मतं मागणाऱ्या आणि स्वत:च्या स्वार्थापोटी राजकीय खेळी करणाऱ्या नेतेमंडळींवर चला हवा येऊ द्या फेम लेखक अरविंद जगताप यांनी सणसणीत शब्दांत टीका केली आहे. 

'गुजरातचे त्याकाळचे सत्ताधारी लोक एक मराठी राजा येईल म्हणून घाबरायचे. त्या मराठी राजांचं नाव होतं शिवाजी महाराज. आता महाराष्ट्र कुणाची वाट पाहतो? कधी अहमद पटेल. कधी अमित शहा. आघाडी आणि यूतीत धमक नाही. स्वत:च्या हिंमतीवर राजा होण्याची ताकद नसेल तर स्वराज्याची स्वप्नं तरी नका दाखवू. पुन्हा कधीच महाराजांच्या नावाने मत मागू नका. स्वस्तातल्या साडीसाठी गुजरात ठीक आहे. नेतानिवडीसाठी नाही', अशा थेट शब्दांत त्यांनी या नेतेमंडळींना धारेवर धरलं. 

जगताप यांनी ही पोस्ट केल्यानंतर त्यावर अनेकांनीच आपल्याही प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. काहींनी ही पोस्ट शेअर करत जगताप यांच्या लेखणीला पुन्हा एकदा प्रतिसाद दिला आहे.