मुंबई : काळ बराच पुढे आला असला तरीही काही मुद्द्यांच्या बाबतीत मात्र अद्यापही कमाल न्यूनगंड दिसून येतो. आता हा न्यूनगंड आणि संकोचलेपणा केव्हा संपणार या प्रश्नाचं उत्तर काही मिळू शकलेलं नाही. पण, विचार करा आजही संकोचलेपणाच्या छायेत लोटणाऱ्या या विषयांना जेव्हा 90 च्या दशकात हाताळलं गेलं असेल तेव्हा नेमकं काय झालं असावं?
तेव्हा...? तेव्हा अशा मुद्द्यांना जाहीरपणे सादर करण्यावरच बंदी घातली जात होती. या साऱ्याचा फटका बसणारी एक अभिनेत्री म्हणजे पूजा बेदी. पूजानं एका कंडोमच्या जाहिरातीत काम केलं होतं. (Bollywood Actress pooja bedi condom ad)
राष्ट्रीय वाहिनी दूरदर्शनकडून मात्र या जाहिरातीच्या प्रसारणावर बंदी घालण्यात आली होती. असं असलं तरीही आपल्या या जाहिरातीमुळं भारतात लैंगिक शिक्षण, शारीरिक संबंध या साऱ्याबद्दल मात्र सजगता दिसून येऊ लागली. या क्रांतीची सुरुवात आपल्यापासून झाल्याचा आनंद पूजानं एका मुलाखतीत व्यक्त केला.
Kamasutra Condoms च्या त्या जाहिरातीमध्ये आघाडीचा मॉडेल Marc Robinson आणि पूजा बेजी झळकले होते. जाहिरातीचं चित्रीकरण Alyque Padamsee यांनी केलं होतं.
टेलिव्हीजनवर दाखवण्याजोगी माहिती जाहिरातीत नसल्याचं म्हणत ती भडकावू असल्याचं कारण त्यावेळी पुढे करण्यात आलं होतं.
त्या काळात आपल्या जाहिरातीवर बंदी घालण्यात आली. पण, आज मात्र परिस्थिती बदलत चालल्याचा मुद्दा पूजानं अधोरेखित केला. 'त्यावेळी परदेशामध्ये वृत्तपत्रांत आम्हाला sexual revolutionची सुरुवात करण्याचं श्रेय देण्यात आलं होतं. तीन दशकांनंतर आता कुठे देशात परिस्थिती बदलतेय. लोक लैंगिक शिक्षण, शरीरसंबंध यांबद्दल खुलेपणानं बोलताना दिसत आहेत', असं म्हणत पूजानं दोन काळांमध्ये तुलना केली.