मुंबई : संपूर्ण देश एकत्र येऊन कोरोनाशी लढा देत आहे. पंतप्रधानांनी देशात लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर प्रत्येकजण आहे त्या ठिकाणीच थांबला आहे. पोलीस, आरोग्य कर्मचारी, सफाई कामगार हे देशाचे सैनिक बनून रक्षण करत आहेत. दुसरीकडे कलाक्षेत्रातील मंडळी देखील घरी राहून समाजाप्रती आपलं योगदान देत आहेत. सिनेसृष्टीतील अनेक सेलिब्रिटींनी घरी राहून कोरोना संदर्भात जनजागृती करणारे व्हिडीओ सोशल मीडियात शेअर केले.
दरम्यान मुंबईतील 'रंगसंगती इंटरटेन्मेंट मंडळ'च्या कलाकारांनी देखील असाच एक व्हिडीओ सोशल मीडियात शेअर केलाय.
कोरोना साथीच्या वाढत्या काळात विनाकारण बाहेर पडणे म्हणजे स्वतःहून आत्महत्या करणे असंच आहे, हा संदेश रंगसंगती इंटरटेन्मेंट मंडळाने बनवलेल्या व्हिडीओतून देण्यात आलाय.
'रंगसंगती'ने याआधी देखील असे प्रबोधनात्मक व्हिडीओ बनवले आहेत. अभिनेता रोहीत माने, पृथ्वीक कांबळे, रोनक शिंदे, चेतन गुरव, प्रशांत केणी तर अभिनेत्री स्नेहल शिदम, वनिता खरात या कलाकांनी मिळून हा व्हिडीओ तयार केलाय.
सर्वात महत्वाचे म्हणजे हा व्हिडीओ बनवण्यासाठी कोणताही कलाकार घराच्या बाहेर गेला नाही. सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमाचं पालन करत प्रत्येकाने स्वत:च्या घरी राहून याचे चित्रिकरण केलं आहे. तेव्हा तुम्ही देखील घरीच थांबा आणि सुरक्षित राहा असा संदेश यातून त्यांनी दिलायं.