'धुरळा' सिनेमातील कलाकारांची रंगांची उधळण

'धुरळा' हा सिनेमा नव्या वर्षात ३ जानेवारी २०२० रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Updated: Dec 2, 2019, 06:56 PM IST
'धुरळा' सिनेमातील कलाकारांची रंगांची उधळण

मुंबई : गेले महिनाभर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण बघता नेमका कोणत्या पक्षाचा मुख्यमंत्री होणार ? हा प्रश्न अवघ्या महाराष्ट्राला पडला होता. पण लवकरच थिएटरमध्ये निवडणुकांचा माहोल रंगणार आहे. समीर विद्वांस दिग्दर्शित आणि क्षितिज पटवर्धन लिखित धुरळा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मराठी सिनेसृष्टीतले अनेक लोकप्रिय कलाकार या सिनेमात एकत्र पाहायला मिळणार आहेत.

'धुरळा' सिनेमाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आणि त्याला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला, टीझरवरून हा चित्रपट ग्रामीण भागातील राजकारणावर आधारित असल्याचं पाहायला मिळत आहे. या सिनेमात अंकुश चौधरी, सई ताम्हणकर, सिद्धार्थ जाधव, अमेय वाघ, अल्का कुबल, सोनाली कुलकर्णी या कलाकारांची फौज या सिनेमात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. नुकतंच त्यांचे कॅरॅक्टर पोस्टर्स प्रदर्शित झाले. त्यात अंकुश चौधरी 'दादा' च्या भूमिकेत तर सिद्धार्थ जाधव 'सिमेंट शेठ' ह्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. सई ताम्हणकर, अल्का कुबल, सोनाली कुलकर्णी यांच्या भूमिकांची नावे अनुक्रमे हर्षदा, अक्का आणि मोनिका अशी असून, अमेय वाघच्या भूमिकेचं नाव हॅशटॅग भावज्या असं आहे. यामुळे सिनेमाची उत्सुकता ताणली गेली आहे.

समीर विद्वांस दिग्दर्शित आणि क्षितिज पटवर्धन लिखित 'धुरळा' सिनेमाची निर्मिती झी स्टुडिओजने केली आहे. हा सिनेमा नव्या वर्षात ३ जानेवारी २०२० रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.