VIDEO : लग्नानंतर दीपिका नव्हे, रणवीरने बदललं नाव?

सेलिब्रिटी जोड्यांच्या गर्दीतही आपलं वेगळेपण सिद्ध करणारी जोडी सध्या एका कारणामुळे पुन्हा चर्चेत येत आहे. 

Updated: Dec 24, 2018, 12:15 PM IST
VIDEO : लग्नानंतर दीपिका नव्हे, रणवीरने बदललं नाव?

मुंबई : अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण यांनी काही दिवसांपूर्वीच त्यांच्या आयुष्याच्या एका वेगळ्या प्रवासाला सुरुवात केली. इटलीत एका खासगी विवाहसोहळ्यात लग्नगाठ बांधत एकमेकांना साथ देण्याची शपथ घेतली. ज्यानंतर अनेकांनीच या जोडीवर शुभेच्छांचा वर्षाव केला. दीपिका पदुकोण आणि रणवीरच्या या प्रेमाचा प्रवास पाहता अनेकांसाठी ही एक वेगळी प्रेरणा ठरली. अशी ही सेलिब्रिटी जोड्यांच्या गर्दीतही आपलं वेगळेपण सिद्ध करणारी जोडी सध्या एका कारणामुळे पुन्हा चर्चेत येत आहे. 

दीप-वीर चर्चेत येण्याचं कारण म्हणजे एक मुलाखत. 'फिल्मफेअर' या मासिकाच्या 'फेमसली फिल्मफेअर' या मुलाखत सत्रात दीपिकाने काही रंजक प्रश्नांची उत्तरं देत सर्वांचच लक्ष वेधलं. तिच्या याच उत्तरांच्या माध्यमातून रणवीरच्या नव्या नावाचाही खुलासा झाला. 

'दीपिका मी तुझा उल्लेख कसा करु?', असा प्रश्न ज्यावेळी फिल्मफेअरच्या संपादकपदी असणाऱ्या जितेश पिल्लई याने विचारला तेव्हा, दीपिकाने त्याला असं काही उत्तर दिलं जे पाहता अरेच्चा... अशीच प्रतिक्रिया अनेकांनी दिली. जितेशच्या प्रश्नाचं उत्तर देत दीपिका त्याला म्हणाली, 'मी तुला काय शिकवलं होतं....? दीपिका पदुकोण..... वाईफ ऑफ रणवीर सिंग पदुकोण असा उल्लेख कर' 

दीपिकाचं हे उत्तर पाहता खरंच रणवीरने त्याचं नाव बदलून रणवीर सिंग भवनानी ऐवजी रणवीर सिंग पदुकोण केलं आहे का, असाच प्रश्न चाहत्यांच्या मनात घर करुन गेला. सहसा लग्नानंतर बऱ्याच अभिनेत्रींनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन नावं बदलल्याचं पाहायला मिळालं आहे. पण, दीप-वीर मात्र याला अपवाद ठरत आहेत, असं म्हणायला हरकत नाही.