बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या एका विधानानंतर चांगलाच गदारोळ माजला होता. नसीरुद्दीन शाह यांनी 'गदर 2', 'द काश्मीर फाईल्स'सारखे चित्रपट हिट होणं हा फार धोकादायक ट्रेंड असल्याचं सांगितलं आहे. एका मुलाखतीत त्यांनी हे विधान केल्यानंतर बॉलिवूडमध्ये खळबळ माजली आहे. दरम्यान, नसीरुद्दीन शाह यांच्या टीकेला 'गदर 2' चे दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी उत्तर दिलं आहे.
"मी नसीरुद्दीन शाह यांचं विधान वाचलं आहे. ते वाचल्यानंतर मला आश्चर्याचा धक्का बसला आहे. नसीर साहेब मला फार चांगले ओळखतात. माझी विचारधारा नेमकी कशी आहे हे त्यांना माहिती आहे. पण ते ज्याप्रकारे 'गदर 2' बद्दल बोलत आहेत, ते ऐकून मी हैराण आहे," असं अनिल शर्मा म्हणाले आहेत.
अनिल शर्मा यांनी सांगितलं आहे की, "मला फक्त इतकंच सांगायचं आहे की मी कोणत्याही समाजाविरोधात नाही. ना कोणत्या देशाविरोधात आहे. गदर एक असा चित्रपट आहे जो देशभक्तीने भरलेला आहे. हा एक सिक्वल आहे. हा एक पूर्णपणे मसाला चित्रपट आहे, जो अनेक वर्षांपासून लोक पाहत आहेत. मी तर नसीर साहेबांना इतकंच सांगेन की त्यांनी आधी गदर 2 चित्रपट पाहावा, नंतर त्यांचं मत आपोआप बदलेल".
"मला तर अजूनही वाटतं की ते अशी विधानं करु शकत नाहीत. मी त्यांच्या अभिनयाचा चाहता आहे. त्यामुळे त्यांनी एकदा चित्रपट पाहावा अशी माझी विनंती आहे. मी नेहमीच मनोरंजनाच्या हेतूने मसाला चित्रपट तयार केले आहेत. यामागे माझा कोणताही राजकीय अजेंडा नाही. नसीर साहेबांनाही हे माहिती आहे," असंही अनिल शर्मा यांनी सांगितलं आहे.
नाना पाटेकर यांनी 'द व्हॅक्सिन वॉर'च्या पत्रकार परिषदेत बोलताना कोणत्याही चित्रपटाचं नाव न घेता टीका केली होती. एका हिट चित्रपटाचं स्क्रिप्ट ऐकून ते इतके हैराण झाले होते की मध्यातच चित्रपटगृहातून बाहेर पडले होते. नाना पाटेकर यांचा इशारा 'गदर 2' कडे असल्याचा दावा केला जात आहे. याचं कारण नाना पाटेकर चित्रपटाच्या स्क्रिनिंगला पोहोचले होते.
यावर बोलताना अनिल शर्मा यांनी सांगितलं की, "हे अजिबात शक्य नाही. पूर्ण चित्रपट पाहिल्यानंतरच ते बाहेर पडले होते. चित्रपट पाहिल्यानंतर ते भावूक झाले होते. ते नक्कीच दुसऱ्या एखाद्या चित्रपटाबद्दल बोलत असतील. त्यांनी आमच्या चित्रपटासाठी वॉइस ओव्हरही दिला आहे. त्यांना आमचा चित्रपट फार आवडला होता. त्यांनी सनी देओल आणि उत्कर्ष यांचं बाँडिंग आवडलं होतं. तुम्ही हवं तर त्यांना विचारु शकता".