मुंबई : 'क्वीन' चित्रपटामुळे प्रकाशझोतात आलेल्या आणि 'फँटम' या प्रयोगशील निर्मिती संस्थेचा एक भाग असणाऱ्या दिग्दर्शक विकास बहल याच्यावर एका महिलेने लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. ज्यानंतर विकासच्या अडचणींमध्ये वाढ झाली होती.
#MeToo चळवळीमुळे विकासवर करण्यात आलेल्या आरोपांमुळे त्याच्याकडे आरोपीच्या नजरेतून पाहू जाऊ लागलं. हे प्रकरण दर दिवशी वेगळ्या वळणावरही पोहोचलं.
आता यात आणखी एकत नवं वळण आलं आहे.
कायद्याच्या कचाट्यात अडकायचं नसल्याचं मुंबई उच्च न्यायालयात स्पष्ट करत आणि प्रतिवादी व्हायचं नसल्याचं लेखी निवेदन करत विकासवर आरोप करणाऱ्या सदर महिलेने या प्रकरणात माघार घेतली आहे.
तिने माघार घेतल्यामुळे आता 'फँटम फिल्म्स'चा भाग असणारे अनुराग कश्यप आणि विक्रमादित्य मोटवाने यांच्यावर करण्यात आलेल्या १० कोटींच्या अब्रुनुकसानीच्या दाव्यावर मुंबई उच्च न्यायालय २५ ऑक्टोबरला सुनावणी करणार आहे.
दरम्यान, मंगळवारी या प्रकरणात करण्यात आलेल्या सुनावणीला अनुराग कश्यप आणि विक्रमादित्य मोटवाने हजर होते. न्यायमूर्ती शाहरुख जे काथावाला यांच्या खंडपीठासमोर याबाबातची सुनावणी पार पडली.
#MeToo या मोहिमेअंतर्गत 'फँटम फिल्म्स'मध्ये काम करणाऱ्या एका महिलेने विकास बहलवर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते.
तिच्या अनुराग कश्यप आणि विक्रमादित्य मोटवाने यांनी पीडित मुलीच्या समर्थनार्थ विधानं केली होती. याच वक्तव्यांमुळे विकास बहलने अनुराग कश्यप, विक्रमादित्य मोटवाने आणि इतरांवर अब्रुनुकसानीचा दावा ठोकला होता.
आपल्यावर करण्यात आलेले हे आरोप खोटे असल्याचं सांगत विकासने यावर आपली प्रतिक्रिया दिली असली तरीही आता याप्रकरणीच्या पुढील सुनावणीकडेच अनेकांचं लक्ष लागून राहिलं आहे.