नेत्यांपाठोपाठ आता अभिनेताही राजभवनावर, या 'हिरो'ने घेतली राज्यपालांची भेट

गेल्या काही दिवसांपासून राजभवन हे महाराष्ट्राच्या राजकारणाचं केंद्रबिंदू बनलं आहे.

Updated: May 30, 2020, 10:24 PM IST
नेत्यांपाठोपाठ आता अभिनेताही राजभवनावर, या 'हिरो'ने घेतली राज्यपालांची भेट

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राजभवन हे महाराष्ट्राच्या राजकारणाचं केंद्रबिंदू बनलं आहे. अनेक राजकारणी मग ते सत्ताधारी असोत किंवा विरोधक वारंवार राजभवनावर जाऊन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेत असल्याचं पाहायला मिळत आहे. एकीकडे नेतेमंडळी राज्यपालांना भेटायला जात असताना अभिनेता सोनू सूद हा देखील राजभवनावर गेला होता. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी सोनू सूदला राजभवनावर भेटायला बोलावलं होतं. 

कोरोना लॉकडाऊनमध्ये परराज्यातल्या मजुरांना त्यांच्या घरी पाठवायला सोनू सूद मदत करत आहे. सोनू सूदच्या या मदतीचं सगळ्यांकडूनच कौतुक होत आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनाही सोनू सूदने केलेलं हे काम आवडलं. राज्यपालांनी या कामाबद्दल सोनू सूदचं कौतुकही केलं आहे. 

'विविध राज्यातील स्थलांतरित लोकांना त्यांच्या मूळ राज्यात सुरक्षित पोहचविण्यासाठी सातत्यपूर्वक करीत असलेल्या प्रयत्नांबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी प्रसिद्ध अभिनेते सोनू सूद यांचे दूरध्वनीवरून अभिनंदन केले', असं ट्विट राजभवनाने केलं आहे. 

सोनू सूद याच्या या उपक्रमाचं सोशल मीडियावर जोरदार कौतुक होत आहे. राज्याचे मंत्री जयंत पाटील यांनीही काही दिवसांपूर्वीच सोनू सूदचं कौतुक केलं होतं. पडद्यावर सोनू सूद खलनायकाची भूमिका रंगवत असला, तरी खऱ्या आयुष्यात सोनू सूद नायक आहे, असं जयंत पाटील म्हणाले होते.