मुंबई : गेल्या कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अभिनेत्रींमधील एक नाव म्हणजे माधुरी दीक्षित. 'धकधक गर्ल' म्हणून माधुरीने पाहता पाहता हिंदी कलाविश्वात तिचं स्थान निर्माण केलं. अभिनयासोबतच नृत्यकौशल्यामुळेही तिच्या लोकप्रियतेमध्ये झपाट्याने वाढ झाली होती. माधुरीच्या सौंदर्याविषयी काही वेगळं सांगण्याची गरज नाही. अनेकांनाच आपल्या सौंदर्याने घायाळ करणाऱ्या माधुरीला मुळात अभिनयापेक्षा मात्र मायक्रोबायॉलॉजीमध्ये जास्त रस होता. अशा या आपल्या स्मितहास्याने अनेकांच्याच काळजाचा ठोका चुकवणाऱ्या माधुरीचा आज वाढदिवस. या खा दिवसाच्या निमित्ताने चला जाणून घेऊया तिच्याविषयीच्या काही खास गोष्टी.
तिला मायक्रोबायॉलॉजिस्ट व्हायचं होतं...
असं म्हटलं जातं की माधुरीला मायक्रोबायॉलॉजीच्या क्षेत्रात करिअर करायचं होतं. किंबहुना ती याच क्षेत्रातील पदवीधारकही आहे.
प्रशिक्षित नृत्यांगना....
वयाच्या तिसऱ्या वर्षापासूनच तिने कथ्थक नृत्याचे धडे गिरवण्यास सुरुवात केली होती. खुद्द कथ्थक नृत्यातील दिग्गज बिरजू महाराज यांनी माधुरी ही बॉलिवूडमधील सर्वोत्तम नृत्यांगना असल्याचं म्हटलं होतं. 'देवदास' या चित्रपटासाठी त्यांनी एका नृत्याचं नृत्यदिग्दर्शन केलं होतं.
सोपी नव्हती यशाची वाट....
१९८४ मध्ये प्रदर्शित झालेल्या अबोध या तिच्या चित्रपटाच्या वाट्याला अपयश आलं होतं. त्यामागोमागही 'स्वाती', 'हिफाजत', 'दयावान' आणि 'खतरों के खिलाडी' या तिच्या चित्रपटांना अपयशाचा सामना करावा लागला होता. अखेर १९८८ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'तेजाब' या चित्रपटामुळे तिच्या कारकिर्दीला कलाटणी मिळाली आणि पाहता पाहता माधुरीचीच जादू सर्वदूर पसरली.
१४ फिल्मफेअर नामांकनं...
माधुरी ही अशी एकमेव अभिनेत्री आहे जिला १४ फिल्मफेअर नामांकनं, चार वेळा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आणि दोन दुसऱ्या विभागातील पुरस्कारही मिळाले होते.
३० किलो वजनाचा पोषाख...
'देवदास' चित्रपटातील 'काहे छेड छेड मोहे' या गाण्याच्या चित्राकरणाच्या वेळी माधुरीने घातलेल्या संपूर्ण पोषाखाचं वजन हे जवळपास तीस किलो इतकं होतं. नीता लुल्ला या फॅशन डिझायनरने हा पोषाख डिझाईल केला होता.
सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री...
कारकिर्दीच्या एका टप्प्यावर यशशिखरावर असताना माधुरी हिंदी कलाविश्वातील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री ठरली होती. 'हम आपके है कौन' या चित्रपटासाठी तिने सलमान खानपेक्षाही जास्त मानधन आकारल्याचं म्हटलं जातं. या चित्रपटासाठी तिने जवलपास २.७ कोटी रुपये आकारले होते, असं म्हटलं जातं.
एम.एफ. हुसैन यांनाही माधुरीची भुरळ....
प्रसिद्ध चित्रकार एम.एफ. हुसैन हेसुद्धा 'हम आपके है कौन' या चित्रपटात माधुरीला पाहून भारावले होते. त्यांनी हा चित्रपट ६७ वेला पाहिला होता. तिच्या 'आजा नचले' या चित्रपटासाठी तर त्यांनी संपूर्ण चित्रपटगृहातील तिकीटीच विकत घेतल्या होत्या.