Happy Birthday Vicky Kaushal: अभिनयासाठी नोकरीवर सोडलं पाणी अन्...

विकीने इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन इंजीनियर म्हणून पदवी घेतली आहे.

Updated: May 16, 2019, 01:43 PM IST
Happy Birthday Vicky Kaushal: अभिनयासाठी नोकरीवर सोडलं पाणी अन्... title=

मुंबई : 'उरी: द सर्जिकल स्ट्राइक' चित्रपटातून स्वत:ची ओळख निर्माण करणारा अभिनेता विकी कौशल आज ३१वा वाढदिवस साजरा करत आहे. अगदी कमी वेळात विक्की कौशलने बॉलिवुडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. १६ मे १९८८ मध्ये मुंबईत विकीचा जन्म झाला. सुरुवातीचे काही दिवस विकी कुटु्ंबासोबत चाळीत राहत होता. विकीला लहानपणापासून डान्सिंग आणि अॅक्टिंगची आवड होती. अभिनेता होण्याआधी विकी इंजिनियरिंगचा अभ्यास करत होता. त्याने २००९ साली इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन इंजीनियर म्हणून पदवी घेतली आहे. 

 
 
 
 

A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09) on

इंजिनियरिंगचा अभ्यास पूर्ण केल्यानंतर विकीला नोकरीसाठी अनेक ऑफर येत होत्या. कॉलेजमध्ये असताना एका नोकरीसाठी विकीने इंटरव्ह्यू दिला होता. कधीही यात करियर करायचं नसतानाही नोकरीत येणाऱ्या दडपणाचा अनुभव घेण्यासाठी हा इंटरव्ह्यू दिला आणि त्या नोकरीसाठी त्याला ऑफर लेटरही देण्यात आलं. पण नोकरी करण्यात रस नसल्याने त्याने नोकरीच्या अनेक ऑफर नाकारल्या. त्यानंतर त्याने 'किशोर मनित कपूर' यांच्या अॅक्टिंग स्कूलमध्ये प्रवेश घेतला. 

२०१० मध्ये विकीने अनुराग कश्यप यांच्या 'गॅग्स ऑफ वासेपुर' या चित्रपटात साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं आहे. 'मसान' चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये करियरची सुरुवात केली. 'मसान'मधील भूमिकेसाठी विकीला सर्वोत्कृष्ट पदार्पण - अभिनेता हा पुरस्कारही देण्यात आला आहे. 

याआधीही विकीने शॉर्ट फिल्म 'गीक आउट', 'लव शक ते चिकन खुराना' आणि 'बॉम्बे वेलवेट' यांसारख्या चित्रपटांमध्ये छोटी भूमिका साकारली होती. त्यांचा दुसरा चित्रपट 'जुबान' २०१६ मध्ये प्रदर्शित झाला होता. त्यानंतर आलेल्या 'रमन राघव २.०' या अनुराग कश्यप यांच्या सायको थ्रिलरमध्ये विकीने सतत नशेत असणाऱ्या व्यक्तीची भूमिका साकारली होती. या चित्रपटात त्याची भूमिका नकारात्मक होती पण अनेक प्रेक्षकांची या भूमिकेला पसंती मिळाली होती. 

त्यानंतर आलेल्या 'राजी' चित्रपटांतून विकीने कमाल करत चांगलीच प्रसिद्दी मिळवली. 'संजू', 'मनमर्जियां', 'उरी' या चित्रपटातून त्याने जबरदस्त कामगिरी करत बॉलिवूडच्या सर्वात हिट अभिनेत्यांच्या यादीमध्ये नाव मिळवलं.

विकी कौशलचं नाव एका अभिनेत्रीशी जोडलं गेल्याच्या चर्चा होत्या. अनेक म्यूझिक व्हिडिओज् आणि वेब सीरिजमधून समोर आलेला चेहरा हरलीन सेठी हिच्याशी विक्कीचं नाव जोडलं गेलं होतं. विक्कीने करण जौहरच्या चॅट शोमध्ये याबाबत खुलासा केला होता. 
 
विकी 'सरदार उधम सिंह' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट २०२० मध्ये प्रदर्शित होणार आहे. याशिवाय करण जौहरच्या 'तख्त'मध्येही भूमिका साकारणार आहे.