मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानौत गेल्या काही दिवसांपासून तिच्या चित्रपटांपेक्षा थेट आणि बोचऱ्या वक्तव्यांमुळे चर्चेचा विषय ठरत आहे. करण जोहर म्हणू नका किंवा मग कलाविश्वातील इतर काही सेलिब्रिटी. कंगनाचं त्यांच्यासोबतचं समीकरण फारसं चांगलं नसल्याचच पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री आलिया भट्ट आणि 'क्वीन' कंगनामध्येही वादाची ठिणगी पडल्याचं पाहायला मिळत आहे. आलियाच्या अभिनयाविषयी कंगनाने नुकतच एक लक्षवेधी वक्तव्य करत नव्या विषयाला वाचा फोडली होती. त्याच वक्तव्यावर आता खुद्द आलियाने प्रतिक्रिया दिली आहे.
'मी कंगनाचा आणि तिच्या कमाचा फार आदर करते. सोबतच मी तिच्या विचारांचाही फार आदर करते', असं अलिया फार समंजसपणे म्हणाली. कंगनाने आपल्या अभिनयाविषयी अशा पद्धतीचं वक्तव्य केलं त्यामागे नक्कीच काहीतरी कारण असेल, असंही तिने स्पष्ट केलं. शिवाय तिचं हे वक्तव्य लक्षात ठेवण्याऐवजी आपण 'राझी' या चित्रपटाच्या वेळी कंगनाने केलेली प्रशंसा लक्षात ठेवू असंही आलिया म्हणाली. कंगनाच्या म्हणण्यानुसार आपण आपल्या कामात गरजेचे सर्व बदल करु आणि ते अधिक चांगलं कसं करता येईल याचाच प्रयत्न करु, असं म्हणत आलियाने कंगनाच्या वक्तव्याकडे अगदी सकारात्मकतेने पाहिल्याचं स्पष्ट झालं.
एका सर्व्हेक्षणानंतर 'बॉलिवूड लाईफ'ने कंगनाला तिची प्रतिक्रिया विचारली होती. त्यावेळी मला अत्यंत शरम वाटत आहे असं म्हणत कंगनाने आलियाच्या 'गली बॉय' या चित्रपटातील भूमिकेत मात देण्यासारखं होतं तरी काय? असा प्रश्न उपस्थित केला होता. बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये असते त्याच प्रकारची फटकळ स्वभावाची मुलगी 'गली बॉय'मध्ये होती. बॉलिवूडकरांसाठी चांगला अभिनय आणि महिला सबलीकरणाची हीच खरी व्याख्या आहे. त्यातही माध्यमांना सेलिब्रिटी कुटुंबांतून आलेल्या मुलांचं फारच कौतुक असतं. मात्र, त्यांनी या अशा सामान्य भूमिकांचं कौतुक करणं थांबवलं पाहिजे. नाहीतर अभिनयाचा मापदंड कधीच पुढे सरकणारच नाही, असं ची म्हणाली होती.
कंगनाच्या या वक्तव्यानंतर कलाविश्वात अनेक चर्चांना उधाण आलं. शिवाय आलियाच्या चाहत्यांमध्येही कमालीचा संताप पाहाय़ला मिळाला. पण, खुद्द आलिया मात्र या साऱ्याकडे फार सकात्मक दृष्टीने पाहत होती हेच तिची प्रतिक्रिया पाहून लक्षात येत आहे.