कैदी नंबर १०६... तुरुंगात वाढला सलमानचा रक्तदाब!

सलमान खानला जोधपूरच्या जेलमधील दोन नंबरच्या वॉर्डमध्ये ठेवण्यात आलंय. सलमान आता जोधपूर जेलमधील १०६ नंबरचा कैदी आहे. सलमान जेलमध्ये आल्यानंतर त्याचा बीपी थोडा वाढल्याची माहिती पोलीस उपमहानिरीक्षक विक्रम सिंग यांनी दिलीय. 

Updated: Apr 5, 2018, 08:44 PM IST
कैदी नंबर १०६... तुरुंगात वाढला सलमानचा रक्तदाब! title=

जोधपूर : सलमान खानला जोधपूरच्या जेलमधील दोन नंबरच्या वॉर्डमध्ये ठेवण्यात आलंय. सलमान आता जोधपूर जेलमधील १०६ नंबरचा कैदी आहे. सलमान जेलमध्ये आल्यानंतर त्याचा बीपी थोडा वाढल्याची माहिती पोलीस उपमहानिरीक्षक विक्रम सिंग यांनी दिलीय. 

सलमानला त्याचा बॉडिगार्ड शेरानं नाश्ता आणला होता. त्याला हा नाश्ता स्वीकारण्याची परवानगी नाकारण्यात आली. सलमानला कैद्याचे कपडे देण्यात आले असून तो उद्या सकाळपासून ते कपडे परिधान करणार असल्याचंही विक्रम सिंग यांनी सांगितलं. आता सलमानला जेलमध्ये जमिनीवरच झोपावं लागणार आहे. 

पाच वर्षांची शिक्षा 

राजस्थानमध्ये १९९८ मध्ये काळवीट शिकार केल्याप्रकरणी सलमान खानला जोधपूरच्या न्यायालयानं पाच वर्षांची शिक्षा सुनावलीय. सैफ अली खान, सोनाली बेंद्रे, तब्बू आणि नीलम या चौघांची मात्र निर्दोष मुक्तता करण्यात आली. त्यामुळं एकटा टायगरच पिंजऱ्यात अडकलाय.

१९ वर्षांपूर्वी मृत्यूमुखी पडलेल्या काळवीटांनी अखेर टायगरची शिकार केलीच. बॉलिवूडचा दबंग खान असलेल्या सलमाननंच काळविटांची शिकार केली, असं सांगत जोधपूर न्यायालयानं त्याला दोषी ठरवलं. वन्यजीव संरक्षण कायद्याच्या कलम ५१ अंतर्गत त्याला १० हजार रूपयांचा दंडही ठोठावण्यात आला. सलमान खान हा वारंवार कायदे मोडणारा गुन्हेगार आहे, असा ठपकाही त्याच्यावर ठेवण्यात आला. 

बहिणींना कोसळलं रडू 

न्यायालयानं शिक्षा सुनावताच सलमानला अक्षरशः रडू कोसळलं. अर्पिता आणि अलविरा या त्याच्या बहिणी तर ढसाढसा रडू लागल्या. पोलिसांनी कसंबसं त्यांना बाजूला करून सलमानला ताब्यात घेतलं आणि त्याची रवानगी जोधपूर मध्यवर्ती कारागृहात केली. सलमान तिथं पोहोचल्यानंतर पोलिसांनी त्याची हजेरी घेतली. 

सलमानचा तोरा कायम

एवढी शिक्षा होऊनही सलमानचा तोरा कायम असल्याचं त्यावेळी जाणवलं. सलमाननं जामिनासाठी जोधपूर न्यायालयात अर्ज केलाय. शुक्रवारी सकाळी त्याबाबतची सुनावणी होणाराय. त्यामुळं गुरूवारची रात्र त्याला सामान्य कैद्यांप्रमाणं जोधपूर जेलमध्येच काढावी लागतेय... सलमानला झालेल्या शिक्षेमुळं बॉलिवूडपासून राजकीय नेत्यांपर्यंत अनेकांनी दु:ख व्यक्त केलंय.

इतर कलाकारांची निर्दोष सुटका

दरम्यान, सलमानला शिक्षा झाली असली तरी सैफ अली खान, सोनाली बेंद्रे, नीलम आणि तब्बू या चौघांची मात्र या खटल्यातून निर्दोष मुक्तता झाली. मात्र, त्यांच्या सुटकेवर बिश्नोई समाजानं नाराजी व्यक्त केली. या निकालाविरोधात बिष्णोई समाज वरिष्ठ न्यायालयात अपील करणार असल्याची माहिती बिष्णोई समाजाच्या नेत्यांनी दिलीय. त्यामुळं हे काळवीट शिकारी प्रकरण आणखी काही काळ न्यायालयीन प्रक्रियेत अडकण्याची शक्यता आहे. तूर्तास सलमानला शुक्रवारी जामीन मिळणार की, टायगरला जेलमध्येच राहावं लागणार, याकडं सर्वांचं लक्ष लागलंय.