मुंबई : बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतने आत्महत्या केल्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसला आहे. ३४ वर्षांच्या सुशांतने त्याच्या वांद्र्याच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. सुशांत सिंग राजपूतचा एमएस धोनी : द अनटोल्ड स्टोरी हा चित्रपट चाहत्यांच्या कायमच लक्षात राहिल. या चित्रपटामध्ये सुशांतने धोनीची भूमिका निभावली होती.
सुशांतने या चित्रपटासाठी धोनीसारखीच हेयरस्टाईल केली होती. एवढच नाही तर चित्रपटासाठी त्याने तासंतास विकेटकीपिंग केली. धोनीचे क्रिकेट खेळतानाचे व्हिडिओही बघितले. या परिश्रमानंतरच त्याने धोनीची भूमिका मोठ्या पडद्यावर जिवंत केली. धोनी चित्रपटासाठी भारताचे माजी क्रिकेटपटू किरण मोरेंनी सुशांतला ट्रेनिंग दिलं होतं.
किरण मोरे सुशांतसोबत रोज उन्हात तीन-चार तास विकेटकीपिंगचा सराव करायचे. या सरावादरम्यान सुशांतची बोटंही तुटली होती. सुशांतने त्याचा पहिला चित्रपट 'काय पो चे'मध्येही क्रिकेटपटूची भूमिका निभावली होती.
धोनी या चित्रपटात भूमिका कशी मिळाली? याबाबत सुशांतला विचारणा करण्यात आली होती. या रोलसाठी माझी निवड का झाली, हे मलाही माहिती नाही, असं उत्तर सुशांतने दिलं होतं. हा रोल मला इतका आवडला की मी याबाबत विचारलच नसल्याचं सुशांतने सांगितलं. मी बिहारचा असल्यामुळे या भूमिकेला न्याय देऊ शकतो. छोट्या शहरातून आलेल्या धोनीने जगात नाव कमावलं, माझाही प्रवास याच्या जवळून जातो, अशी प्रतिक्रिया तेव्हा सुशांतने दिली होती.
बेबी चित्रपट बनवताना नीरज पांडे यांची भेट धोनीचे मॅनेजर अरुण पांडे यांच्याशी झाली. त्यावेळी अरुण पांडे यांनी धोनीच्या आयुष्यावर आधारित चित्रपट बनवण्याची कल्पना नीरज पांडेंना सुचवली. धोनीने या चित्रपटासाठी मंजुरी द्यायला बराच वेळ लावला. धोनीसारखं दिसणं, त्याच्यासारखे शॉट मारणं, यामध्ये कुठेही कमतरता राहू नये, म्हणून सुशांतने बरेच वेळा धोनीची भेट घेतली होती.