मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ‘ठाकरे’ या सिनेमात अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिकेत दिसणार असल्याने या सिनेमाची उत्सुकता अधिकच वाढली आहे.
खरंतर त्याच्या नावाची घोषणा झाल्यावर अनेकांना धक्काही बसला आणि आनंदही झाला. धक्का यासाठी कारण याच शिवसेनेने त्याला रामलीलेत भूमिका करण्यापासून रोखल्याची चर्चा होती. पण त्यानेच त्या वादावर आता पडदा टाकला आहे.
‘ठाकरे’ या सिनेमात बाळासाहेब ठाकरेंच्या भूमिकेसाठी आधी अभिनेता अजय देवगण याच्या नावाचीही चर्चा होती. पण अखेर ही भूमिका नवाजुद्दीनच्या खात्यात गेली. त्यामुळे आणखी एक अजरामर भूमिका त्याच्या यादीत सामिल झाली आहे. नुकतीच त्याने इंडियन एक्सप्रेसला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्याने याबाबत शिवसेनेचे आभार मानले आहेत.
रामलीलेत भूमिके करण्यावर शिवसेनेच्या विरोधाबाबत तो या मुलाखतीत म्हणाला की, ‘रामलीलेत भूमिका करण्यास मला शिवसेनेने विरोध केला नव्हता. प्रसारमाध्यमांनी चुकीच्या पद्धतीने ती बातमी सादर केली होती. संबधीत व्यक्ती ही शिवसेनेतील नव्हती. रामलीलेतील माझ्या भूमिकेवर शिवसेनेनं आक्षेप घेतला ही बातमी चुकीची आहे. संबधित व्यक्ती रामलीला बंद पाडण्याची धमकी देत असल्यानं मी ते सादर न करण्याचा निर्णय घेतला, असं तो म्हणाला.
‘शिवसेनेने मला बाळासाहेबांची भूमिका साकरण्याची संधी दिली, त्यांनी माझी निवड केली त्यासाठी मी शिवसेनेचे आभार मानतो. त्यांनी माझी निवड केली हीच सर्वात मोठी गोष्ट आहे. मीच काय जगातील कोणताही अभिनेता असता तरी त्यानं ही संधी सोडली नसती’, असेही तो म्हणाला.