नवी दिल्ली : लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर अनेक बॉलिवूड कलाकारांनी राजकारणात नवी इंनिंग सुरू केली आहे. अनेक कलाकारांनी राजकीय पक्षात प्रवेश केला आहे. त्यातच आता बॉलिवूड धग-धग गर्ल माधुरी दीक्षितही राजकारणात येणार असल्याची चर्चा होती. परंतु माधुरीने ती कोणत्याही पक्षाकडून लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
माधुरी भाजपाकडून पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं बोललं जात होतं, परंतु माधुरीने तीने कोणत्याही राजकीय पक्षाशी जोडली नसल्याचं सांगत या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. 'आयएएनएस'शी बोलताना 'ही केवळ अफवा आहे. मी कोणत्याही राजकीय पक्षाकडून निवडणूक लढवणार नाही. मी याआधीही याबबात माझे विचार स्पष्ट केले होते. मला वाटतं बॉलिवूडमधून आमच्या तीन जणांबाबत अशाप्रकारची अफवा पसरवण्यात आली होती आणि याविषयी मी आधीच माझे विचार स्पष्ट केले असल्याचं' माधुरीने म्हटलं आहे.
1984 मध्ये 'अबोध' चित्रत्रपटातून माधुरीने बॉलिवूड चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. माधुरी भारतीय सिनेमांतील सर्वोत्तम आणि महत्त्वपूर्ण चेहरा आहे. 'राम लखन', 'बेटा', 'तेजाब', 'खलनायक', 'देवदास' यांसारख्या चित्रपटातून माधुरीने दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. बहुप्रतिक्षीत मल्टीस्टारर 'कलंक' चित्रपटातूनही माधुरी बहार बेगमची महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे. 'कलंक' चित्रपटातील नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'घर मोरे परदेसिया' गाण्यातील माधुरीच्या गेटअपला प्रेक्षकांकडून चांगली पसंती मिळत आहे.
माधुरी सध्या तिच्या आगामी मराठी '15 ऑगस्ट' चित्रपटाचं प्रमोशन करण्यात व्यस्त आहे. '15 ऑगस्ट' येत्या 29 मार्चला नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे.