मुंबई : बॉलिवूड अभिनेता इम्रान खान आणि त्याची पत्नी यांच्या नात्यात दुरावा आल्याची चर्चा सध्या सुरु आहे. काही दिवसांपूर्वीपासूनच नात्यातील कटुतेमुळे त्या दोघांनीही घटस्फोचा निर्णय घेतला असल्याचंही म्हटलं जात आहे. त्यांचं नातं आता पूर्वीप्रमाणे राहिलं नसून, त्यात बरंच अंतर आलं आहे.
घटस्फोटाविषयीचे प्रश्न विचारताच तुम्ही असे प्रश्न कसे विचारु शकता, असा प्रतिप्रश्न त्याने केला. दरम्यान, फार सुरुवातीपासून तो आपल्या खासगी आयुष्याविषयी माध्यमांसमोर खुलेपणाने बोलत नसे. त्यामुळे त्याचं असं वागणं ही काही नवी बाब नाही.
एकिकडे इम्रानने त्याच्या आणि अवंतिकाच्या नात्याविषयी फार काही माहिती दिलेली नसताना दुसरीकडे अवंतीकाने थेट तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरील नावातून 'खान' हटवलं आहे. अवंतिकाचा हा निर्णय पाहता या सेलिब्रिची जोडप्याच्या नात्यात गोष्टी बिनसल्या असल्याचं स्पष्ट होत आहे.
अवंतिका आणि इम्रान येत्या काळात या नात्यातून पूर्णपणे विभक्त होणार असल्याचं जवळपास निश्चित झालं असल्याची चिन्हं आहेत. पण, अवंतिकाच्या आईने मात्र यापैकी कोणत्याच वृत्तांना दुजोरा दिलेला नाही. त्यांच्या नात्यात काही मतभेद आहेत. पण, ते येत्या काळात दूर होतील असं त्यांनी स्पष्ट केलं. जवळपास आठ वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर अवंतिका आणि इम्रान विवाहबंधनात अडकले होते. २०११ मध्ये त्यांनी सहजीवनाच्या प्रवासाला सुरुवात केली. पण, हे नातं आता मात्र एका वेगळ्याच वळणावर आलं आहे.