मुंबई : अभिनय कौशल्य आणि आपल्या अनोख्या अंदाजाच्या बळावर अभिनेता सलमान खान याने कलाविश्वात त्याचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. सलमानच्या चाहत्यांचा वाढता आकडा याचाच प्रत्यत देतो. काही दिवसांपूर्वीच तो भारत या चित्रपटातून मध्यवर्ती भूमिका साकारत प्रेक्षकांच्या भेटीला आला. ईदच्या मुहूर्तावर रसिकांच्या मनोरंजनासाठी आलेला हाच भाईजान सध्या मात्र त्यांना भावूक करत आहे. मुख्य म्हणजे त्यामागचं कारणंही तसंच आहे.
वडिलांच्या आठवणीने भावूक झालेल्या भारत साकारणाऱ्या सलमानला पाहता अनेकांच्याच डोळ्यांत अश्रू तरळले आहेत. अली अब्बास जफर दिग्दर्शित 'भारत' या चित्रपटातील #AayaNaTuSong 'आया ना तू....' हे गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे.
देशाची फाळणी होत असताना ज्याप्रमाणे अनेक कुटुंबांना त्यांच्या आप्तजनांपासून दूर जावं लागलं होतं, तोच विरह भारतच्याही वाट्याला आला होता. याचं सुरेख चित्रण या गाण्यातून करण्यात आलं आहे. भावभावनांची सांगड घालत त्याला शब्दांची साथ देत 'आया ना तू...' साकारण्यात आलं आहे.
सुनील ग्रोव्हर, कतरिना कैफ आणि अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या अभिनयाची झलकही गाण्यातून पाहायला मिळत आहे. बदलता काळ, अपेक्षा, आदर, भीती आणि नात्यातील ओलावा या गाण्याच्या जमेच्या बाजू ठरत आहेत. इर्शाद कामिल लिखित या गाण्याला विशाल शेखरने संगीतबद्ध केलं आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या 'भारत' या चित्रपटाच्या कमाईचे आकडे वाढत असतानाच आता प्रदर्शित झालेल्या गाण्यामुळे चित्रपट न पाहिलेल्या प्रेक्षकांमध्येही त्याविषयी कुतूहल पाहायला मिळत आहे. तेव्हा जास्तीत जास्त प्रेक्षकांना चित्रपटगृहाकडे आकर्षित करण्यात 'भारत' यशस्वी ठरतो का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.