इंडियाज मोस्ट वॉन्टेड : हत्यारांविनाच झाली या दहशतवाद्याला अटक

'इंडियाज मोस्ट वॉन्टेड' एका दहशतवाद्याशी संबंधित सत्य घटनेवर आधारित आहे.

Updated: May 3, 2019, 10:18 AM IST
 इंडियाज मोस्ट वॉन्टेड : हत्यारांविनाच झाली या दहशतवाद्याला अटक title=

मुंबई : आगामी बॉलिवूड चित्रपट 'इंडियाज मोस्ट वॉन्टेड' एका दहशतवाद्याशी संबंधित सत्य घटनेवर आधारित आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक राजकुमार गुप्ता यांनी याबाबत माहिती दिली आहे. हा चित्रपट दहशतवादी संघटना मुजाहिदीनचा संस्थापक यासीन भटकळवर आधारित असल्याचे बोलले जात आहे. दिग्दर्शक राजकुमार गुप्ता यांनी 'चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित असून यात कोणत्या दहशतवाद्याबाबत सांगण्यात आले आहे, कोणत्या घटनेवर चित्रपट आधारित आहे हे चित्रपट पाहिल्यावरच तुम्हाला समजू शकेल' असं म्हटलं आहे. एका दहशतवाद्याला गोळी न चालवता पकडले जाते ही भारतीय गुप्तचर विभागासाठी एक ऐतिहासिक घटना आहे. परंतु चित्रपट पाहिल्यानंतरच याबाबत संपूर्ण, विस्तृत स्वरुपात माहिती मिळू शकते असं त्यांनी म्हटलंय.

काही दिवसांपूर्वी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला होता. चित्रपटाचा २.३० मिनिटांचा ट्रेलर प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी ठरतोय. अर्जुन कपूर चित्रपटात प्रमुख भूमिकेत असून त्याच्या पाच जणांच्या टीमसह कोणत्याही गोष्टीची पर्वा न करता भारतातील मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याला पकडण्याची जबाबदारी घेतो. कोणत्याही हत्याराचा वापर न करता दहशतवाद्याला पकडण्याची योजना आखण्यात येते. त्यासाठी केवळ बुद्धी आणि विविध योजनांचा वापर करत कशाप्रकारे यासिन भटकळला पकडण्यात आलं याबाबतची सत्य कथा चित्रपटातून मांडण्यात आली आहे. 

एकेकाळी दिल्ली पोलीसांच्या १५  दहशतवाद्यांच्या यादीत यासिन भटकळ याचं नावं सामिल होतं. ऑगस्ट २०१३ मध्ये बिहार पोलीस आणि गुप्तचर विभागाकडून भटकळला भारत-नेपाळ सीमेवर अटक करण्यात आली होती. चित्रपटात अभिनेता अर्जुन कपूर प्रमुख भूमिका साकारणार आहे. चित्रपटाचं शूटिंग भारतासह नेपाळमध्येही करण्यात आलं आहे चित्रपट येत्या २४ मे रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित करण्यात येणार आहे.