स्टॅम्प पेपरवरच अभिनेत्रीला पतीकडून तिहेरी तलाक

एका स्टॅम्प पेपरवर अभिनेत्रीला तलाकनामा पाठवला आहे

Updated: Jul 31, 2019, 02:42 PM IST
स्टॅम्प पेपरवरच अभिनेत्रीला पतीकडून तिहेरी तलाक

मुंबई : राज्यसभेत तिहेरी तलाक विधेयक मंजूर झालं. मात्र तरीही तिहेरी तलाकअंतर्गत लग्नातून मुक्त होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. नुकतंच भोजपुरी अभिनेत्री रेशमा उर्फ अलीना शेखने, तिच्या पतीवर १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर तलाकनामा पाठवला असल्याचा आरोप लावला आहे. त्याशिवाय अभिनेत्रीने पती बेपत्ता असल्याचीही तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनंतर पोलिसांनी अलीनाच्या पतीचा शोध सुरु केला आहे.

अलीनाने तक्रारीमध्ये, तिच्या पतीने, मुदस्सिरने तिला एका स्टॅम्प पेपरवर तलाकनामा पाठवला असल्याचं सांगितलं. मात्र, आपल्याला हा तलाक मंजूर नसल्याचं अभिनेत्रीने म्हटलं आहे. 

अभिनेत्री अलीनाने २०१६ मध्ये इंदोरमधील अपोलो टॉवरमध्ये चपलांचा व्यवसाय करणाऱ्या अब्दुल्लाह उर्फ मुदस्सिर बेगसह प्रेमविवाह केला होता. मात्र लग्नानंतर अलीनाने कलाविश्वाला रामराम केला. अलीना आणि मुदस्सिर यांना २ महिन्यांचा मुलगाही आहे. 

अलीनाला तिच्या पतीने २०१७ मध्येही तिहेरी तलाक देत वकीलांमार्फत तलाकचे कागदपत्र पाठवले होते. मात्र, तिहेरी तलाकविरोधात सुरु असलेल्या मोहिमेच्या भीतीमुळे मुदस्सिर तलाक देऊ शकला नसल्याचे बोलले जात आहे.

अलीना रेशमा या नावानेही प्रसिद्ध आहे. अलीनाने भोजपुरी आणि काही बॉलिवुड चित्रपटांमध्ये काम केलं आहे.