पाहा अजय - अतुलच्या घराचे खास फोटो

आपल्या प्रत्येकालाच आपला आवडता कलाकार किंवा एखादा सिंगर कसा राहतो? त्याचं राहणीमान काय किंवा त्याच्याबद्दलच्या अगदी छोट्या छोट्या गोष्टी जाणून घेण्यात अधिक रस असतो. 

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Aug 23, 2017, 01:22 PM IST
पाहा अजय - अतुलच्या घराचे खास फोटो  title=

मुंबई : आपल्या प्रत्येकालाच आपला आवडता कलाकार किंवा एखादा सिंगर कसा राहतो? त्याचं राहणीमान काय किंवा त्याच्याबद्दलच्या अगदी छोट्या छोट्या गोष्टी जाणून घेण्यात अधिक रस असतो. 

तसंच आज आपण आपले आवडते सिंगर आणि महाराष्ट्राची शान असलेला अजय - अतुल यांच्या घराला भेट देणार आहोत. अजय - अतुल ही फक्त महाराष्ट्राचीच नाही तर आता भारतीय संगीत क्षेत्रातील सर्वात आघाडीची संगीतकार जोडी आहे. लॉस एंजेलिसच्या सोनी एमजीएम या जगातील सर्वात अत्याधुनिक साऊंड स्टुडिओमध्ये अजय-अतुल यांनी 'सैराट' या सिनेमातील गाण्यांचे रेकॉर्डिंग केल आणि मराठी सिनेसृष्टीत एक इतिहास रचला.  पुण्यातील मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या अजय-अतुल यांनी सिनेसृष्टीत स्वबळावर स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण केले आहे.

मराठी, हिंदीसोबतच त्यांनी तेलुगू चित्रपटांसाठी संगीत दिग्दर्शक म्हणून भूमिका बजावली. अजय-अतुल या जोडीतील अजय गोगावले यांचा नुकताच  वाढदिवस पार पडला असून अजयने वयाची ४१  वर्षे पूर्ण केली आहेत. अजय गोगावले हे अतुल यांच्यापेक्षा दोन वर्षांनी लहान आहे. शास्त्रशुद्ध संगीताचे शिक्षण न घेताही त्यांनी संगीतात नवनवीन प्रयोग केले आहेत. 'सैराट' सिनेमाच्या माध्यमातून सातासमुद्रापार त्यांनी मराठी पताका फडकावली आहे. जे श्रवणीय वाटते, हृदयाला भिडते आणि आत्म्याला अंतर्मुख करते तेच खरे संगीत, अशी त्यांची संगीताबद्दलची भावना आहे. 

यांनी टिपलेत हे खास फोटोग्राफ्स 

फोटोग्राफर प्रशांत भट यांनी अजय - अतुल यांच्या घरातील फोटो क्लिक केले आहेत. आणि हे फोटो आपल्यापर्यंत पोहोचवले आहेत. घरातील प्रत्येक वास्तू या फोटोत कैद झाली आहे. आणि अजय - अतुलच्या स्वप्नातील घर या फोटोजमध्ये एका आठवणीच्या रूपात उपलब्ध आहेत. प्रशांत भट यांची अधिक फोटोग्राफी पाहण्यासाठी तुम्ही या लिंकवर क्लिक करू शकता.Prashant Bhat's Photography Work 

संघर्षातून पायवाट काढत आज यशोशिखर गाठणा-या या दोन भावांनी पुण्यात त्यांचा स्वप्नातील आशियाना उभारला आहे.

पुण्यातील बाणेर परिसरात २०१३ मध्ये त्यांनी आलिशान घर उभे केले. स्टुडिओ फाइव्ह इंडिया या कंपनीत कार्यरत सचिन खाटपे यांनी त्यांच्या घराचे इंटेरियर डिझाइन केले आहे. सचिन यांनी दिलेल्या माहितीनुसार, अजय-अतुल यांची आवड-निवड लक्षात घेऊन घराचे इंटेरिअर करण्यात आले आहे. त्यांना त्यांच्या घराला वेस्टर्नसोबतच खास मराठमोळा टच हवा होता. त्यानुसार घराला फ्युजन टच देण्यात आला आहे. 

नऊ ते दहा महिन्यात घराचे इंटेरियर पुर्ण करण्यात आले. तीन बेडरुम, लिव्हिंग रुम, किचन असलेल्या या घरातील लिव्हिंग रुमला इटालियन पद्धतीने डिझाइन करण्यात आले आहे.

एकंदरीतच घरात महाराष्ट्रीयन फ्युजन आर्किटेक्चरची झलक बघायला मिळते. अजय-अतुल यांच्या घरात एक सुंदर मंदिर असून तिथे विठ्ठल-रुक्मिणीची सुंदर मुर्ती विराजमान आहे.

शिवाय अजय अतुल यांनी घरात एक स्टुडिओ करुन घेतला आहे. येथे त्यांनी अनेक गाण्यांच्या चाली तयार केल्या आहेत. हे सगळे फोटो प्रशांत भट यांनी काढले आहेत. 

 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x