'माध्यमांवरही मुव्ही माफियांचं नियंत्रण'; कंगनाचं ठाम मत

पुन्हा एकदा 'क्वीन' बरसली... 

Updated: Jul 17, 2019, 10:13 AM IST
'माध्यमांवरही मुव्ही माफियांचं नियंत्रण'; कंगनाचं ठाम मत

मुंबई: काही दिवसांपूर्वीच 'जजमेंटल है क्या' या आगामी चित्रपटाच्या निमित्ताने आयोजित एका कार्यक्रमाच्या वेळी अभिनेत्री कंगना रानौत हिची एका पत्रकाराशी शाब्दिक बाचाबाच झाली. त्याचविषयी कंगनाने झी मीडियाला दिलेल्या एका मुलाखतीत काही गोष्टी स्पष्ट केल्या. या मुलाखतीत तिने तिच्याविरोधात बॉलिवूड कलाविश्वात तयार झालेल्या एका फळीविषयी वक्तव्य करत मुव्ही माफिया म्हणत करण जोहर, हृतिक रोशन यांच्यावर निशाणा साधला. 

हिंदी कलाविश्वात माध्यमांचा असा एक गट आहे ज्याच्यावर 'मुव्ही माफियां'चं नियंत्रण आहे, असं ठाम मत तिने मांडलं. पत्रकारांनी एखाद्या गोष्टीचं निरिक्षण केल्यानंतर जे पटलं नाही त्याची निंदा करणं हे त्यांचं काम आहे. मी कायमच अशा स्पष्ट कामाची प्रशंसा केली आहे. कारण यामुळेच मला स्वत:लाही आयुष्यात, कामात आणि अभिनयाच्या क्षेत्रात पुढे येण्याची संधीही मिळाली आहे, असं म्हणत कंगनाने आपल्याला पत्रकारांच्या एका ठराविक गटाचा राग असल्याचंही सांगितलं. 

राजकारणात येण्याचा आपला कोणताही विचार नसल्याचं स्पष्ट करत तिने आपल्याला काही राजकीय पक्षांकडून राजकारणात प्रवेश करण्यासाठीचे प्रस्ताव आल्याची बाबही सर्वांसमक्ष ठेवली. महेश भट्ट, रणबीर कपूर, आलिया भट्ट यांच्यासोबतच्या वादावरही तिने या मुलाखतीदरम्यान प्रतिक्रिया दिल्या. नि:स्वार्थ व्यक्तींची बॉलिवूडमध्ये कमतरता असल्याचं म्हणत महेश भट्ट यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्याची खंत नाही. मी जे काही केलं, ते योग्यच केलं असंही ती म्हणाली. यावेळी मुलाखत घेणाऱ्या वृत्तनिवेदिकेने कंगनासमोर एका जुन्या प्रसंगाचा विषय काढला होता. 

एकंदर वागण्यावरुन आपण विरोधकांना निरुत्तर केलं आहे, असं मोठ्या विश्वासाने म्हणत तुम्ही चांगलं बोलू शकत नाही, तर कमीत कमी वाईट बोलू नका, हा इशारा तिने दिला. या अशा वागण्यामुळे कलाविश्वात एका वळणावर इतरांशी संबंध बिघडू शकतात, ज्याचे थेट परिणाम चित्रपटांच्या प्रस्तावावारही होती याची भीती वाटत नाही का? असा प्रश्न विचारला असता आपण या परिस्थितीला घाबरत नसल्याचं वक्तव्य कंगानाने केलं. काम न मिळण्याची भीती नाही, कारण या चित्रपटविश्वात चांगली आणि पाठिंबा देणारी माणसंही आहेतच असं ती मोठ्या विश्वासाने म्हणाली. 

कंगनाची ही मुलाखत पाहता आपल्या भूमिकांवर बॉलिवूडची ही क्वीन कायमच ठाम असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट होत आहे. दरम्यान, काही दिवसांमध्येच कंगना 'जजमेंटल है क्या' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बालाजी टेलिफिल्म्सच्या निर्मितीअंतर्गत साकारल्या जाणाऱ्या या चित्रपटाच्या निमित्ताने ती पुन्हा एकदा अभिनेता राजकुमार राव याच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे.