मुंबई : हिमाचलच्या पहाडी मुलीनं पुन्हा एकदा बंडखोरी केली आहे, आम्ही बोलतोय कंगना राणावतबद्दल. मनात येईल तसं, कुठलाही आड पडदा न ठेवता ती धडाधड बोलून टाकते. याहीवेळी तिनं असंच केलं. मात्र नंतर पश्चाताप झाल्याचंही ती म्हणाली.. मग प्रश्न असा निर्माण होतो की हे सगळं कशासाठी.... ?
कंगना म्हणजे बंडखोरी.. कंगना म्हणजे बेधडक, कंगना म्हणजे वादळ, हे वादळ पुन्हा आलं आहे. एका खाजगी वाहिनीच्या कार्यक्रमात कंगनाने विचारलेल्या प्रश्नांना बेधडक उत्तरं दिल्याने कंगना पुन्हा चर्चेत आलीय. खाजगी प्रेमप्रकरण, बॉलिवूडमधला ढोंगीपणा, महिला आयोग यावर या झाशीच्या राणीने सपासप वार केले.
अशी धडधडीत विधानं आणि तीही एकेरी उल्लेख करत कंगनानं मुलाखतीदरम्यान केली. कंगनानं महिला आयोगाबद्दल केलेल्या विधानाला महिला आयोगानं आक्षेप घेतलाय.
महिलांच्या मदतीसाठी महिला आयोग तत्पर आहे. दुर्दैवानं मिस रानौत यांनी आमची प्रतिमा चुकीच्या पद्धतीनं रंगवली. कंगना किंवा गुरमीत चढ्ढा यांनी महिला आयोगाशी कुठलाही संपर्क साधलेला नाही. कंगनानं महिला आयोगावर केलेल्या चुकीच्या आरोपांमुळे व्यथित झालो आहोत . या मुलाखतीनंतर उगाच जास्त बोलले, अशी कबुलीही कंगनानं दिली.
बेधडक मुलाखत द्यायची आणि मग पश्चाताप झाल्यासारखं दाखवायचं. यातून कंगनानं काय साधलं ? कंगनाचा सिमरन हा नवा सिनेमा येतोय. त्यामध्ये तिची भूमिका साधारणपणे क्वीनसारखी स्वच्छंदीच आहे. त्यामुळे या सिनेमाच्या प्रसिद्धीसाठी हा सगळा खटाटोप होता का, असा संशय येतोय.