बॉलिवूड दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहरच्या (Karan Johar) धर्मा प्रोडक्शनने (Dhamrma Production) मोठा निर्णय घेतला आहे. धर्मा प्रोडक्शन यापुढे कोणत्याही चित्रपटाचं प्री-स्क्रिनिंग ठेवणार नाही. मीडियाला संबोधित करतान प्रोडक्शन हाऊसने एक निवेदन जारी केलं आहे. धर्मा प्रोडक्शनचे सह-संस्थापक करण जोहर आणि अपूर्व मेहता यांची स्वाक्षरी असणाऱ्या या पत्रात कारण सांगण्यात आलं आहे.
पत्रात माध्यमांनी संबोधित करत सांगण्यात आलं आहे की, "वर्षानुवर्षे खरंतर दशके, तुम्ही धर्मा प्रॉडक्शनच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहात, आमच्या चित्रपटांना पाठिंबा दिलात, आमची स्वप्नं वाटून घेतलीत आणि आमचे विजय साजरे केले. या संपूर्ण प्रवासात तुमचा विश्वास आमच्यासाठी एक प्रेरक शक्ती ठरली आहे. आम्ही तुमच्या सर्वांचे मनापासून आभार मानू इच्छितो आणि प्रत्येक कव्हरेज, रिव्ह्यू आणि प्रतिक्रिया आमच्यासाठी अमूल्य आहेत. त्यांनी निर्विवादपणे आमचे चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यास मदत केली आहे".
पत्रात पुढे लिहिलं आहे की, "जसजसं आपण प्रगती करत आहोत तसंतसं आपण स्वतःला एका अशा टप्प्यावर शोधतो जिथे आपण आपल्या दृष्टिकोनाशी जुळवून घेतले पाहिजे आणि नवनवीन प्रयत्न केलं पाहिजे. बराच विचारविनिमय केल्यानंतर, आम्ही सर्वानुमते आमच्या आगामी चित्रपटांसाठी प्री-रिलीज स्क्रिनिंग टाळण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय आमच्यासाठी थोडा कठीण होता. पण आम्हाला वाटतं हे पाऊल फार गरजेचं होतं. मीडियामधील आमच्या मित्रांसह प्रत्येक दर्शक आमच्या कथांचा साक्षीदार आहे. आम्हाला विश्वास आहे की हा निर्णय त्यांचा सिनेमॅटिक अनुभवाचा उत्साह टिकवून ठेवण्यास मदत करेल".
प्रोडक्शन हाऊसने स्पष्ट केले की प्री-रिलीज स्क्रिनिंग होणार नसले तरी, वेळेवर रिव्ह्यूंसाठी चित्रपटाच्या रिलीजच्या दिवसाच्या पहिल्या दिवशी माध्यमांसाठी स्क्रीनिंग आयोजित करतील. "आम्हाला वेळेवर दिले जाणारे रिव्ह्यूंचे महत्त्व आणि आमच्या चित्रपटांच्या यशात त्यांची भूमिका समजली आहे. त्यामुळे आम्हाला हे जाहीर करताना आनंद होत आहे की आम्ही आमच्या प्रत्येक चित्रपटासाठी रिलीजच्या पहिल्या दिवशी प्रेस स्क्रीनिंग आयोजित करणार आहोत. आम्ही सर्व मीडिया कर्मचाऱ्यांचे यामध्ये सहभागी असण्यासाठी मनापासून स्वागत करतो, जिथे तुम्ही आमच्या नवीनतम निर्णयाचे साक्षीदार व्हाल".
धर्मा प्रोडक्शन सध्या आलिया भटची प्रमुख भूमिका असणाऱ्या 'जिगरा' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे.