विकीसोबतच्या लग्नाबाबत कतरिना म्हणते, मला 15 वर्षांपासून...

लगेचच ही जोडी डिसेंबरमध्ये विवाहबंधनात अडकणार असल्याचं म्हटलं गेलं

Updated: Oct 27, 2021, 04:11 PM IST
विकीसोबतच्या लग्नाबाबत कतरिना म्हणते, मला 15 वर्षांपासून...  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई :  बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि 'उरी' फेम अभिनेता विकी कौशल यांच्या लग्नाच्या चर्चांनी सध्या चांगलाच जोर धरला आहे. नुकतंच त्यांच्या एका ठिकाणहून एकमागोमाग एक बाहेर निघताना या दोघांनाही पाहिलं गेलं. ज्यानंतर लगेचच ही जोडी डिसेंबरमध्ये विवाहबंधनात अडकणार असल्याचं म्हटलं गेलं. 

यंदाच्या वर्षाचा शेवट गोड करत कतरिना आणि विकी त्यांच्या नव्या आयुष्याची सुरुवात करणार करणार आहेत असं म्हटलं गेलं. 

लग्नाचं ठिकाण, लग्नाची वेळ इतकंच काय तर लग्नाच्या दिवशी कतरिना कोणत्या सेलिब्रिटी डिझायनरनं डिझाईन केलेला लेहंगा घालणार हेसुद्धा निश्चित झाल्याचं म्हटलं गेलं. 

प्रतीक्षा होती ती फक्त विकी किंवा कतरिनाच्या अधिकृत प्रतिक्रियेची. अखेर कतरिनानं या साऱ्यावर मौन सोडत मोठा खुलासा केला. 

मागच्या जवळपास 15 वर्षांपासून मला हा प्रश्न विचारला जात आहे, असं म्हणत आपल्यासमोर कायमच हा लग्नाचा प्रश्न मांडला गेल्याचं तिनं स्पष्ट केलं. 

आता कतरिनानं दिलेलं हे उत्तर पाहता, नेमकं सत्य काय हाच नवा प्रश्न अनेकांपुढे उभा राहिला आहे. काहींनी तर या प्रकरणी डिसेंबरचीच वाट पाहण्याचा पर्याय निवडला आहे.