Baipan Bhari Deva: गेल्या काही महिन्यांपासून स्त्रीप्रधान भुमिका या गाजताना दिसत आहेत. हिंदी सिनेसृष्टीतही गेल्या काही दिवसांपासून स्त्रीप्रधान भुमिका या गाजू लागल्या आहेत. त्यातून मराठी चित्रपटसृष्टीतही आता अशाप्रकारे सिनेमे येऊ लागले आहे. मागच्या वर्षी प्रदर्शित झालेला 'झिम्मा' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तूफान गाजला. यापुर्वीही मराठी चित्रपटसृष्टीत स्त्रीप्रधान भुमिका असणारे चित्रपट येऊन गेले आहेत आणि यापुढेही येणार आहेत. आजची ही स्त्री ही झपाट्यानं बदलते आहे. त्याचसोबत आजच्या पिढीतील स्त्री आणि मागच्या पिढीतील स्त्री यांचे एकमेकांसोबतचे असलेले अनोखे नातेही जगासमोर येताना दिसते आहे. त्यामुळे असे विषय पाहणंही प्रेक्षकांसाठी पर्वणीच ठरते. केदार शिंदे यांचा 'महाराष्ट्र शाहीर' हा चित्रपट या वर्षी तूफान गाजला.
आता प्रेक्षकांसाठी ते आगळ्यावेगळ्या सिनेमाची मेजवानी घेऊन येत आहेत. 'बाईपण भारी देवा' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च सोहळा नुकताच पार पडला आहे. यावेळी अशोक सराफ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते हा चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झाला आहे. यावेळी दिग्दर्शक केदार शिंदे, रोहणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, दीपा परब चौधरी, शिल्पा नवलकर, सुकन्या कुलकर्णी मोने, गायिका सावनी रविंद्र, संगीतकार साई-पियुष आणि या चित्रपटाची संपुर्ण टीम उपस्थित होती.
हेही वाचा - रूपेरी पडद्यावरील हेमा मालिनींचा आवाज हरपला! ज्येष्ठ गायिकेचे वयाच्या 86 वर्षी निधन
या चित्रपटातून सहा बहिणींची गोष्ट प्रेक्षकांसमोर येणार आहे. ज्यातून आपल्याला त्यांची नातं, त्यांच्यापुढील असलेली आव्हानं, त्यांचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, प्रेम, माया आणि त्यांच्या विविध व्यक्तिमत्त्वांचे दर्शन चित्रपटातून मिळणार आहे. एका मंगळागौर स्पर्धेत या बहिणी एकत्र येतात आणि काही कारणांमुळे विभक्त झालेल्या या बहिणी पुन्हा नव्यानं कशा भेटतात याचा हळूहळू उलगडा या चित्रपटातून होणार आहे. 30 जून रोजी हा चित्रपट आपल्या सर्वांच्या भेटीला येणार आहे. विनोद, थोडासा रूसवा फुगवा, दु:ख आणि हास्य या सर्वांचा मेळ यातून पाहायला मिळणार आहे.
हा चित्रपट मल्टिस्टारकास्ट आहे त्यामुळे नाना तऱ्हेच्या कलाकारांची भट्टी यावेळी तुम्हाला पाहायला मिळणार आहे. महिलांभोवती फिरणारी ही कथा नक्कीच आपल्याला खूप काही शिकवून जाणार आहे. सुकन्या मोने, रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, दीपा चौधरी, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर या चित्रपटांतील प्रमुख नायिका आहे. सोबतच पियुष रानडे, शरद पोंक्षे, तुषार दळवी हे कलाकारही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.